अवैध रेती वाहतुकीचा बळी!; उपचारादरम्‍यान गंभीर जखमी मजुराचा मृत्‍यू, तिघांची मृत्‍यूशी झुंज!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर उलटल्याने झालेल्या अपघात टिप्परमध्ये बसलेले 4 मजूर गंभीर जखमी झाल्याची 13 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील दादगाव- ईसापूर मार्गावर घडली होती. या प्रकरणी काल पहाटे जलंब पोलीस ठाण्यात टिप्परचालक दशरथ ठाकरे (रा. वाघूड ता. मलकापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर उलटल्याने झालेल्या अपघात टिप्परमध्ये बसलेले 4 मजूर गंभीर जखमी झाल्याची 13 जूनच्‍या रात्री साडेदहाच्या सुमारास जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील दादगाव- ईसापूर मार्गावर घडली होती. या प्रकरणी काल पहाटे जलंब पोलीस ठाण्यात टिप्परचालक दशरथ ठाकरे (रा. वाघूड ता. मलकापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघातील गंभीर जखमींपैकी एका मजुराचा उपचारादरम्‍यान अकोला येथे मृत्‍यू झाला. तिघे मृत्‍यूशी झुंज देत आहेत.

दादगाव- इसापूर मार्गावर काल रात्री साडेदहाच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर (एमएच 21 एक्स 4421) उलटले होते. रेतीची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याने टिप्पर सुसाट होते. यातच चालकाचे नियंत्रण सुटून ते उलटले. टिप्परमध्ये बसलेले मजूर भिकनशाह रहीम शाह (21), सलमान खाँ अयुब खाँ (21), समीर शाह रहिम शाह (18), सोहेल शाह मुनाफ शाह(19, सर्व रा. मुस्तकअलीनगर, मलकापूर) गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्‍णवाहिकेतून उपचारासाठी खामगाव येथे दाखल केले.

अवैध रेतीमाफिया बेलगाम..!
जलंब पोलीस ठाण्यात पांडुरंग इंगळे ठाणेदार असताना त्‍यांनी अवैध रेतीमाफियांविरोधात मोहीम हाती घेतली होती. त्‍यामुळे अवैध माफियांना लगाम बसला होता. त्‍यांनी केलेल्या सिनेस्‍टाइल कारवाया जिल्हाभर गाजल्या होत्‍या. श्री. इंगळे जलंबमध्ये जाण्याआधी एका पोलीस कर्मचाऱ्याला रेती वाहतुकीच्‍या वाहनाने चिरडले होते. त्‍यामुळे तेव्‍हाच्‍या ठाणेदारांची बदली होऊन तत्‍कालिन पोलीस अधीक्षकांनी स्‍थानिक गुन्‍हे शाखेतून पांडुरंग इंगळे यांची जलंबला बदली करत ठाणेदार केले होते. इंगळे यांनी अल्पावधीतच परिसरात लौकिक कमावला होता. सामान्यांनाही ते आपले अधिकारी वाटत असल्याने तक्रारींची संख्याही वाढली होती. मात्र त्‍यांची बदली झाल्यानंतर पुन्‍हा रेतीमाफिया बेलगाम झाले असून, यातून हा मजुराचा बळी गेला तर तिघे मृत्‍यूशी झुंज देत असल्याची चर्चा आहे.