अशीही भामटेगिरी… बँकेचा कर्मचारी सांगून असे गंडवले की तुम्‍ही वाचूनच थक्‍क व्‍हाल!; खामगाव शहरातील एसबीआय बँकेत घडली घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खात्यातून 4000 रुपये काढल्यानंतर दाम्पत्य बँकेबाहेर पडत असताना एक व्यक्ती धावत आला. तुम्हाला 300 रुपये कमी भेटले असून, साहेबांकडून पैसे बरोबर करून आणतो असे म्हणून तो 4000 रुपये घेऊन गेला, तो परत आलाच नाही. दाम्पत्याने बँकेतील ‘साहेबां’ना विचारले असता त्यांनी तुम्ही फसवले गेल्याचे सांगितले. दाम्पत्याने डोक्यावर हात मारत खामगाव शहर …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खात्‍यातून 4000 रुपये काढल्‍यानंतर दाम्‍पत्‍य बँकेबाहेर पडत असताना एक व्‍यक्‍ती धावत आला. तुम्‍हाला 300 रुपये कमी भेटले असून, साहेबांकडून पैसे बरोबर करून आणतो असे म्‍हणून तो 4000 रुपये घेऊन गेला, तो परत आलाच नाही. दाम्‍पत्‍याने बँकेतील ‘साहेबां’ना विचारले असता त्‍यांनी तुम्‍ही फसवले गेल्याचे सांगितले. दाम्‍पत्‍याने डोक्‍यावर हात मारत खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून त्‍या भामट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. ही घटना काल, 4 जून रोजी दुपारी 1 च्या सुमारास खामगाव शहरातील एसबीआयच्‍या फरशी चौक शाखेत घडली.

सौ. नंदा जनार्दन पवार (45) या घरकाम व मजुरी करतात. त्‍या हिरानगरात पती व मुलांसह राहतात. त्‍यांचे फरशी चौकातील स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यात बचतगटाचे कर्जाचे पैसे येत असतात. एक महिन्यापूर्वी त्‍यांनी बचतगटाचे कर्ज घेतल्याने त्यांच्‍या खात्यात 20000 रुपये आले होते. पैकी आठ ते दहा दिवसांपूर्वी 15 हजार रुपये काढले होते. काल, 4 जून रोजी आणखी 4000 रुपयांचे काम असल्याने त्‍या पतीसह दुपारी एकला बँकेत आल्या आणि पैसे काढले. बँकेतून बाहेर पडत असतानाच त्‍यांच्‍याकडे जावेद नावाचा एक माणूस आला. त्‍याने बँकेतच नोकरीला असल्याचे सांगितले. तुम्हाला तुमच्या पैशांत तीनशे रुपये कमी भेटले आहेत.

साहेबाजवळ जाऊन पैसे बरोबर करून देतो असे सांगून त्याने त्‍यांच्‍याकडील 4000 रुपये परत मागितले. नंतर त्‍याने नंदाबाईंना बँकेतील दाराजवळच थांबवून ठेवले व तेथून निघुन गेला. तो बराच वेळ झाला तरी आला नाही म्हणून नंदाबाईंनी बँकेतील अधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिली असता त्‍यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास सांगितले. त्‍यामुळे नंदाबाईंनी खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.