आता राजकारण्यांना नगरपंचायत निवडणुकीच्या मुहूर्ताची प्रतीक्षा! ठरणार आघाडी व भाजपमधील कडवी लढत

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषद झाली. ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामुळे आता जिल्ह्यातील राजकारण्यांना नगरपंचायत निवडणुकीच्या मुहूर्ताची आतुरता लागली आहे. आघाडीतील बिघाडी दूर झाली तर ही निवडणूक महाआघाडी विरुद्ध भाजपा असा जंगी मुकाबला ठरणार आहे. राज्यातील 3 नगर परिषद व 65 नगरपंचायतींची मुदत सरत्या वर्षातच संपली आहे. यात बुलडाण्यातील संग्रामपूर …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषद झाली. ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामुळे आता जिल्ह्यातील राजकारण्यांना नगरपंचायत निवडणुकीच्या मुहूर्ताची आतुरता लागली आहे. आघाडीतील बिघाडी दूर झाली तर ही निवडणूक महाआघाडी विरुद्ध भाजपा असा जंगी मुकाबला ठरणार आहे.

राज्यातील 3 नगर परिषद व 65 नगरपंचायतींची मुदत सरत्या वर्षातच संपली आहे. यात बुलडाण्यातील संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतींचा समावेश आहे. प्रत्येकी 17 सदस्यीय या नगरपंचायतींच्या निवडणुकांची पूर्वतयारी कधीचीच झाली आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, प्रभागदर्शक नकाशे, हरकतीवर सुनावणी या प्रक्रिया पार पडल्या. विभागीय आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली. दुसरीकडे एरवी मागील वर्षातच लागणार्‍या या निवडणुकीची राजकारण्यांनी सुद्धा पूर्वतयारी केली आहे. यामुळे प्रशासन व राजकीय या दोन्ही क्षेत्रांना मुहूर्ताचे वेध लागणे स्वाभाविक ठरले आहे.
नेत्यांमधील प्रतिष्ठेची लढत ठरणार…
दरम्यान ही लढत वरकरणी आघाडी व भाजपमधील लढाई ठरली असतानाच दिग्गज नेते व आजी- माजी व भावी आमदारांमधील राजकीय प्रतिष्ठेचा जंगी मुकाबला ठरणार आहे. यंदाच्या लढतीत स्वबळावर बहुमत मिळविण्याचे आव्हान आमदारद्वय संजय कुटे व संजय गाईकवाड यांच्यासमक्ष राहणार आहे. मागील लढतीत अपयशी ठरलेल्या आमदार कुटे यांना आघाडीच्या एकत्रित ताकदीशी मुकाबला करून हे टार्गेट गाठावे लागणार आहे. मोताळ्यात वरकरणी आघाडी मजबूत भासत असली तरी बुलडाणा मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातून विस्तव जात नाही. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गत 5 वर्षांत मोताळा नगरपंचायतीमधील सत्ता टिकविली. त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आघाडीमधील ही बिघाडी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. मात्र आमदारकीचे दावेदार योगेंद्र गोडे यांनी जोर लावणे गरजेचे आहे. आघाडी व भाजपा असा दुहेरी मुकाबला राहील, अन्यथा बेबनाव कायम राहिला तर मोताळ्यात बहुरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही, अर्थात हे चित्र मुहूर्त जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.