आत्मबोधातच जिवनाचे कल्याण : विवेकानंद जन्मोत्सवात हभप श्रीरंग महाराज बाहेगावकर यांचे प्रतिपादन

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माणूस सुखाच्या प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असतो. सुख प्राप्ती त्याच्या जीवनाचे ध्येय असते. ऐहिक सुखासाठी भौतिक वस्तूंचा साठा तसेच इंद्रियाव्दारे मिळणार्या सुखासाठी धावणार्या मानवासाठी आत्मबोधाची जाणीव होत नाही. उपाधी आणि बाह्य प्रतिकांमध्ये अडकलेला मानव खर्या सुखाला प्राप्त होत नाही. कारण आत्म्याची जाणिव आणि आत्मबोधच मानवी जीवाचे खरे कल्याण आहे, असे …
 

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माणूस सुखाच्या प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असतो. सुख प्राप्ती त्याच्या जीवनाचे ध्येय असते. ऐहिक सुखासाठी भौतिक वस्तूंचा साठा तसेच इंद्रियाव्दारे मिळणार्‍या सुखासाठी धावणार्‍या मानवासाठी आत्मबोधाची जाणीव होत नाही. उपाधी आणि बाह्य प्रतिकांमध्ये अडकलेला मानव खर्‍या सुखाला प्राप्त होत नाही. कारण आत्म्याची जाणिव आणि आत्मबोधच मानवी जीवाचे खरे कल्याण आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. श्रीरंग महाराज वाहेगावकर यांनी विवेकानंद जयंती महोत्सवात मंगळवारी (दि. 2) सकाळी 10 वाजता सादर केलेल्या प्रवचनात व्यक्त केले.
निद्रेतून जागे व्हा या आभासी जगाच्या पलीकडे आत्मभान नावाची शक्तीची जाणिव झाल्यावर ध्येयसिध्दी निश्‍चित प्राप्त होते. स्वामीजी योध्दा संन्यासी होते. त्यांच्या जयंतीनिमित्त संपन्न होणारा हा उत्सव व निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या मानवसेवेच्या या पथावर सर्वसामान्य माणसाला अग्रेसर केल्याशिवाय राहणार नाही, असेही श्रीरंग महाराजांनी सांगितले. आज विवेकानंद जयंतीला मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या समाधीचे विधीयुक्त मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले. आसक्तीने परमेश्‍वर प्राप्ती शक्य नाही. निरासक्त भावनेने केलेले कोणतेही कर्म परमेश्‍वराला प्राप्त होते. साधूच्या संगतीत व्यतीत केल्याने जीवनाची सार्थकता होते, असेही त्यांनी सांगितले.

विवेकानंद जन्मोत्सवात उद्या होणारे कार्यक्रम
विवेकानंद जयंती महोत्सवाचा उद्या, 3 फेब्रुवारीला दुसरा दिवस असून, दुपारी 2 वाजता अखिल मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व्याख्यान सादर करणार आहेत. आपल्या वेगळ्या वक्तृत्वशैलीने लोकांना खेळवून ठेवणारे ग्रामोन्नतीचा मार्ग सुकर करणारे आदर्श ग्राम पाटोदाचे निर्माते भास्कर पेरे पाटील यांचे दुपारी 3.30 वाजता व्याख्यान होणार आहे. पुणे येथील ख्यातनाम कीर्तनकार अनेक संगीत नाटकात लीलया भूमिका करणारे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. चारूदत्त आफळे यांचे रामदासी किर्तन होणार आहे. त्यानंतर सुप्रसिध्द विचारवंत, लेखक, ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे सायंकाळी 7 वाजता श्रोत्यांना मार्गदर्शन करतील. सायंकाळी 8.30 ते 10 वाजता सुप्रसिध्द कीर्तनकार हभप संजय महाराज पाचपोर महाराज कीर्तन सादर करतील. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांचा भाविकांनी व श्रोत्यांनी ऑनलाइन लाभ घेतला. बुलडाणा लाइव्ह आणि आश्रमाच्या यु ट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम लाइव्ह सुरू होता. उद्या होणार्‍या कार्यक्रमात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता आपण घरी राहूनच ऑनलाइन पध्दतीने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

विवेकानंद जन्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण खास वाचकांच्या आग्रहास्तव बुलडाणा लाइव्हवर
केवळ बुलडाणाच नव्हे तर देश आणि देशाबाहेरील व्यक्तींसाठीही औत्सुक्याचा विषय ठरलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण खास वाचकांच्या आग्रहास्तव बुलडाणा लाइव्हवर करण्यात येत असून, भक्तीच्या आणि विचारमंथनाच्या या रंगात बुलडाणा लाइव्ह टीमसुद्धा यानिमित्ताने वाचकांना घेऊन रंगणार आहे… दिवसभर महोत्सवाला पाहूया लाइव्ह…बुलडाणा लाइव्हसोबत..
महोत्सव लाइव्ह पहा :

किंवा भेट द्या :
www.buldanalive.com