आत्‍मदहनासाठी पेट्रोल घेऊन मोबाइल टॉवरवर चढले; दोन युवकांचा कारनामा; सैलानी बाबा संदल प्रकरणी दाखल गुन्‍हे मागण्यासाठी कारनामा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रशासनाचे नियम धुडकावून पिंपळगाव सराईजवळील (ता. बुलडाणा) सैलानी बाबा दर्गा येथे संदल काढण्यात आला होता. या संदलमध्ये मोठी गर्दी उसळली होती. कोरोनाची चिंता न करता हा सर्व प्रकार घडल्याने प्रशासनाने यासाठी मुजावर परिवाराला जबाबदार ठरवत 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत दोन युवक आज, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रशासनाचे नियम धुडकावून पिंपळगाव सराईजवळील (ता. बुलडाणा) सैलानी बाबा दर्गा येथे संदल काढण्यात आला होता. या संदलमध्ये मोठी गर्दी उसळली होती. कोरोनाची चिंता न करता हा सर्व प्रकार घडल्‍याने प्रशासनाने यासाठी मुजावर परिवाराला जबाबदार ठरवत 10 जणांविरुद्ध गुन्‍हे दाखल केले होते. हे गुन्‍हे मागे घेण्याची मागणी करत दोन युवक आज, 10 एप्रिलला थेट मोबाइलवर टॉवरवर चढले. सोबत त्‍यांनी पेट्रोलची कॅनही नेली होती. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली. रायपूर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून दोघांना खाली उतरवत ताब्यात घेतले.

सैलानी बाबा दर्गा येथे दरवर्षी यात्रोत्सवानिमित्त संदल काढला जातो. मात्र मागील वर्षी व याही वर्षी कोरोनामुळे ही यात्रा जिल्हा प्रशासनाने स्थगित केली होती. 2 एप्रिल रोजी मुजावर परिवारातील काही सदस्यांनी परंपरा कायम ठेवत संदल काढला. त्यावेळी एकच गर्दी उसळली होती. गर्दीला कारणीभूत ठरल्याने मुजावर परिवाराला जबाबदार ठरवत पोलिसांनी या परिवारातील दहा जणांविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. सैलानी येथे लोकांची गर्दी जमणे हे प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे मुजावर परिवाराविरुद्ध दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा बुलडाणा येथील सुरेश पाटील उर्फ माऊली व शेख नफीस शेख हफिज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 5 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात दिला होता. त्यांच्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने सुरेश पाटील व शेख नफीस हे दोघे आज सकाळी पिंपळगाव सराईजवळच्या एका मोबाइल टॉवरवर चढले. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्‍न केला. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांना आत्महत्या करण्यास थांबवून खाली उतरवले. त्‍यांना ताब्यात घेत ठाण्यात नेण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता.