आत्‍महत्‍येची धमकी देताच निलंबित वनपालाला 8 तासांसाठी रूजू करून घेतले!; दीपाली चव्हाण यांचा आदर्श घेण्याची केली होती भाषा!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करून स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देणारे वनपाल एस. जी. खान यांना अखेर पूर्ववत सेवेत घेण्यात आले. मात्र ज्या दिवशी त्यांचे निलंबन मागे घेतले, त्याच दिवशी ते सेवानिवृत्त झाले. त्यामुळे अवघ्या 8 तासांसाठी त्यांना पुन्हा सेवेत येण्याची संधी मिळाली. 23 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांना निलंबित करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करून स्‍वतःच्‍या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देणारे वनपाल एस. जी. खान यांना अखेर पूर्ववत सेवेत घेण्यात आले. मात्र ज्‍या दिवशी त्‍यांचे निलंबन मागे घेतले, त्‍याच दिवशी ते सेवानिवृत्त झाले. त्‍यामुळे अवघ्या 8 तासांसाठी त्‍यांना पुन्‍हा सेवेत येण्याची संधी मिळाली. 23 फेब्रुवारी 2021 रोजी त्‍यांना निलंबित करण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्‍हाण आत्‍महत्‍या प्रकरण राज्‍यभर गाजत असल्याने त्‍याचा धसका घेऊन निलंबन मागे घेण्यात आल्याची चर्चा वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांत सुरू आहे.

खान हे जळगाव जामोद परिक्षेत्राचे वनपाल आहेत. त्यांच्‍याविरुद्ध प्राप्‍त तक्रारींवरून कर्तव्‍यात कसूर केल्या प्रकरणात त्‍यांना निलंबित करण्यात आले होते. त्‍यानंतर खान यांनी 29 मार्च रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना पत्र लिहून उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्यावर गंभीर आरोप केले  होते. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया आपणच केल्याचा दावा खान यांनी केला आहे. एका महिन्यावर सेवानिवृत्ती आली असताना सूडबुद्धीने निलंबन करण्यात आले. निलंबनाच्या बातम्यासुद्धा उपवनसंरक्षकांनीच छापून आणल्या व त्यामुळे आपली बदनामी झाली, असे पत्रात म्हटले होते. दीपाली चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही जिवाचे बरे वाईट करावे असे वाटते. माझे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार उपवनसंरक्षक गजभिये राहतील. आता जगण्याची उमेद संपली, असे खान यांनी या पत्रात म्हटले होते. या पत्राची दखल घेत खान यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात येत असल्याचे आदेश उपवनसंरक्षक बुलडाणा यांनी काढले.

खान यांनी तयार केलेला व्‍हिडिओ.

व्‍हिडिओ केला व्‍हायरल…

प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करूनच खान थांबले नव्‍हते, तर त्‍यांनी व्हिडिओ तयार करून आपल्यावरील अन्याय मांडला होता. हे सर्व प्रकरण वरिष्ठांनी गांभीर्याने घेतले.

डिक्‍कर संतापले…

अनेक चुकीच्‍या कामांत लिप्त असल्याचा आरोप झालेल्‍या खान यांचे निलंबन मागे घेण्यात आल्‍याचे समजताच त्‍यांच्‍याविरोधात तक्रार करणारे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्‍कर संतापले असून, केवळ 8 तासांसाठी त्‍यांचे निलंबन मागे घेण्याचा खटाटोप कशासाठी करण्यात आला, असा सवाल त्‍यांनी केला. तसेच या विरोधात आपण न्‍यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिला.

ही प्रशासकीय बाब, विभागीय चौकशी सुरूच

खान यांना अनियमिततेच्‍या कारणास्‍तव निलंबित केले होते. शासनाच्‍या धोरणानुसार त्‍यांच्‍यावर वेळेत दोषारोपपत्र बजावण्यात आले आहे. त्‍यांना शासन सेवेत पुन्‍हा घेणे आणि निलंबन ही प्रशासकीय बाब असून, त्‍यांच्‍याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे, असे स्‍पष्टीकरण उपवनसंरक्षकांनी एका पत्रात दिले आहे.