आधी कोरोना रुग्‍णांची बिले तपासणार, मग हॉस्पिटलला देणार!!; पालकमंत्र्यांच्‍या निर्देशाने रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना दिलासा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः खासगी रुग्णालयांना कोविड आजारावर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात खासगी रुग्णालये रुग्णांना लुटत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी देयके तपासल्याशिवाय घेऊ नये, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज, 9 मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठक झाली. त्यावेळी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः खासगी रुग्णालयांना कोविड आजारावर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात खासगी रुग्णालये रुग्णांना लुटत असल्याच्‍या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी देयके तपासल्याशिवाय घेऊ नये, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज, 9 मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठक झाली. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते. सभागृहात आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, आमदार राजेश एकडे आदी उपस्थित होते. खामगाव येथील कोविड निदान प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, खामगाव येथील प्रयोगशाळा तातडीने सुरू झाली पाहिजे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील चाचण्यांचे अहवाल लवकर प्राप्त होतील आणि बाधित रुग्णांना उपचार मिळतील. तसेच ज्या खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर व ऑक्सीजन ऑडिट राहिले असल्यास त्यांनी तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आहेत. त्या ठिकाणी सिटी स्कॅन स्कोअर बघून उपचार दिले जातात. त्यांची आर. टी. पी. सी.आर चाचणी केली जात नाही. त्यामुळे रुग्ण संख्या कमी दिसून येते. परिणामी जिल्ह्याला रेमेडेसिविर व ऑक्सीजन पुरवठा जिल्ह्याला कमी होतो. त्यामुळे खासगी रुग्णालयामधील रुग्णांची आर. टी. पी. सी.आर चाचणी करावी. तसेच कोविड उपचार सुरू असलेल्या रुग्णांची बाधित म्हणून नोंद करा. बेडची माहिती मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ॲपची तांत्रिकता तपासून ते लाँच करावे. लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना करत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की दुसरा डोस पूर्ण करून नंतरच पहिल्या डोसला सुरुवात करावी. लसीकरणाच्या दिवशी गावातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत. लसीकरण गतीने पूर्ण होण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे. यावेळी जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.