आमदार संजय गायकवाडांकडून १० हजारांची फौज आणि शस्‍त्रांची भाषा मागे! ॲट्रॉसिटीबद्दलच्‍या वक्तव्यावर ठाम!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर, ता. खामगाव) येथे दहा हजारांची फौज आणि शस्त्र पुरविण्याची केलेली भाषा बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज, ८ जुलैला पत्रकार परिषदेत मागे घेतली. मात्र ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत. समाजाविरोधात नाही तर गुंड प्रवृत्तीच्या विरोधात बोललो, असे स्पष्ट करून त्यांनी वाघ कुटूंबांच्या पाठिशी कायम खंबीरपणे उभे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर, ता. खामगाव) येथे दहा हजारांची फौज आणि शस्‍त्र पुरविण्याची केलेली भाषा बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज, ८ जुलैला पत्रकार परिषदेत मागे घेतली. मात्र ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल केलेल्या वक्‍तव्‍यावर ते ठाम आहेत. समाजाविरोधात नाही तर गुंड प्रवृत्तीच्या विरोधात बोललो, असे स्‍पष्ट करून त्‍यांनी वाघ कुटूंबांच्या पाठिशी कायम खंबीरपणे उभे असल्याचा पुनरूच्‍चार केला.

चितोडा येथे १९ जूनला वाघ आणि हिवराळे कुटुंबात वाद झाला होता. खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर, संजय गायकवाड यांनी गावाला भेट देऊन वाघ कुटुंबियांना दिलासा दिला होता. गायकवाड यांनी गावात केलेल्या वक्‍तव्‍यांमुळे ते चर्चेत आले होते. ॲट्रॉसिटीबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्यासह राज्यभरात त्यांच्या विरोधात निवेदने व आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर श्री. गायकवाड यांनी पत्रकार परिषद बोलावल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ज्या विषयामुळे ते वादात सापडले होते, त्या ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल आजही ते ठाम असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

पोत्या गुंडच; त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल
चितोडा येथील रमेश हिवराळे ऊर्फ पोत्या गुंड आहे. त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत, हे सांगताना आमदार गायकवाड यांनी पोत्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच पत्रकारांना दाखवली. पोत्याने हजारोंच्या जमावासह वाघ परिवारावर हल्ला केला. वाघ परिवारातल्या आया-बहिणींना त्याने शिविगाळ केली. त्यामुळे त्या महिलाही पोत्याला घाबरून कुटारात जाऊन लपल्या. त्या जर पोत्याच्या तावडीत सापडल्या असत्या तर काहीही घडले असते. पोत्याने व जमावाने वाघ परिवारावर क्रूर हल्ला केला. वाघ परिवाराच्या घरातील सर्व सोने नाणे सामान चोरून केले. पोत्याने चाकूने सागरवर हल्ला चढवला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सागरने आत्मरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नात पोत्याचा चाकू पोत्यालाच खुपसला गेला. डिझेल टाकून सागरचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. वाघ परिवाराच्या घरातील देवी देवतांच्या मूर्त्या जमावाने फोडल्या. शिवरायांचा पुतळाही फोडला हे सांगताना आमदार गायकवाड यांनी वाघ परिवाराच्या घराचे व नुकसानीचे फोटोही दाखवले. या प्रकरणात पोलिसांनी केवळ वाघ परिवारालाच दोषी धरले.

आठ दिवस हिवराळे गटावर कोणतीही ॲक्शन घेतली नाही. खासदार प्रतापराव जाधव चितोड्यात गेल्यानंतर हिवराळे गटातील आरोपींना अटक केली. हल्ला वाघ परिवारावर झाला, अन्याय वाघ परिवारावर झाला म्हणून आपण फक्त वाघ परिवारालाच भेटलो, असेही आमदार गायकवाड म्हणाले. यावेळी लोकांना धीर देण्यासाठी आपण १० हजारांची फौज व शस्‍त्र आणि अस्त्र हा शब्दप्रयोग केला. मात्र हे शब्द जाहीरपणे मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस कुणी करत असेल तर त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्याला खोट्यानेच उत्तर द्या या शब्द प्रयोगाबद्दल आपण आजही ठाम असल्याचे आमदार गायकवाड म्हणाले.