आयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आयशर ट्रकने कारला जोरात धडक दिली. यात कारमधील पाच जण जखमी झाले. ही घटना काल, २१ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास चिखली-खामगाव रोडवरील बोरगाव वसू फाट्याजवळ घडली. जखमींवर अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोपाल अरुण शेळके (रा. सस्ती वाळेगाव ता. पातूर, जि. अकोला) हे पुण्यात राहतात. ते गावाकडे कारने …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आयशर ट्रकने कारला जोरात धडक दिली. यात कारमधील पाच जण जखमी झाले. ही घटना काल, २१ जुलैला दुपारी १२ च्‍या सुमारास चिखली-खामगाव रोडवरील बोरगाव वसू फाट्याजवळ घडली. जखमींवर अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गोपाल अरुण शेळके (रा. सस्ती वाळेगाव ता. पातूर, जि. अकोला) हे पुण्यात राहतात. ते गावाकडे कारने (MH 30 BB 0685) कुटुंबासह येत होते. त्‍यांच्‍या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकने (MP 28 G 4722) जोरात धडक दिली. आयशर चालक अशोक स्वरुपसिंग ढोके (रा. कुरई, छिंदवाडा, मध्यप्रदेश) हा अपघात झाल्यानंतर पसार झाला. अपघात होताच मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने चिखलीच्‍या जंजाळ हॉस्पिटलमध्ये हलवले व घटनेची माहिती गोपाल शेळके यांचे मावस भाऊ तुषार खोले (रा. करोडी, ता. अकोट, जि. अकोला) यांना कळवली. खोले हे तातडीने चिखलीकडे येण्यासाठी निघाले.

चिखलीला आल्यानंतर त्‍यांनी जखमींची विचारपूस करून सर्वांना अकोला येथे रुग्‍णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. जखमींत गोपाल शेळके (३२), त्यांची पत्नी सौ. प्रियांका (२७), त्यांच्या दोन मुली आरोही (६), शिवण्या (४), व काका प्रकाश खोले (६०) यांचा समावेश आहे. काका प्रकाश खोले यांना म्युकर मायकोसिस आजार झाल्याने ते दीड महिन्यापासून पुणे येथे वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ते बरे झाल्यानंतर त्‍यांना घरी करोडी येथे सोडण्यासाठी गोपाल कुटुंबासह निघाले होते. मात्र ट्रकने उडवले. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.