आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत सोडतीव्दारे राज्यस्तरावरून खासगी शाळांतील 25 टक्के कोटा अंतर्गतचे प्रवेश निश्चित केले जातात. त्यानुसार 2021-22 या वर्षांच्या आरटीई 25 टक्के …
 
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत सोडतीव्दारे राज्यस्तरावरून खासगी शाळांतील 25 टक्के कोटा अंतर्गतचे प्रवेश निश्चित केले जातात. त्यानुसार 2021-22 या वर्षांच्या आरटीई 25 टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) 7 एप्रील 2021 रोजी राज्यस्तरावरून काढण्यात आलेली आहे. परंतु कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावामुळे प्रवेशाची प्रक्रिया शासन स्तरावरून तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती. शासनाच्‍या 4 जूनच्‍या पत्रानुसार प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आहेत.

सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रक्रियेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना आरटीई 25 टक्के कोट्यात निवड यादीची लॉटरी लागली आहे. त्या मुलांच्‍या पालकांनी 11 जूनपासून संबंधित शाळेत जाऊन तात्पुरता प्रवेश निश्‍चीत करावा. प्रवेशासाठी पालकांनी जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी पुरावा, आधार इत्यादी बाबतची मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात. शाळेमध्ये कागदपत्र पडताळणीकरिता पालकांनी एकाच वेळी न जाता, ज्या पालकांना शाळेकडून मेसेज प्राप्त होईल त्याच पालकांनी शाळेत जावे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. प्रवेश प्रक्रिया 11 जून 2021 पासून सुरू होत असून, पालकांना प्रवेशासाठी 20 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. याची नोंद जिल्ह्यातील शाळा व पालकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.