आरोपीच्‍या वाहनात एकट्या निःशस्‍त्र वनरक्षकाला बसवून पाठवले कार्यालयात… मध्येच लाकूड तस्‍करांनी केले ‘कांड’!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वनरक्षकाला मारहाण करून लाकडांनी भरलेले वाहन पळविल्याची घटना जळगाव जामोद ते वडशिंगी रोडवरील निंभोरा फाट्यावर काल, 6 जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेतून वनविभागाचाही हलगर्जीपणा समोर आला असून, एकट्या वनरक्षकाला आरोपींच्या वाहनात बसवून कार्यालयाकडे पाठविले गेले होते. यातून वनरक्षकाच्याही जिवाला धोका होऊ शकला असता. विशेष म्हणजे हा …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वनरक्षकाला मारहाण करून लाकडांनी भरलेले वाहन पळविल्याची घटना जळगाव जामोद ते वडशिंगी रोडवरील निंभोरा फाट्यावर काल, 6 जून रोजी रात्री आठच्‍या सुमारास घडली. या घटनेतून वनविभागाचाही हलगर्जीपणा समोर आला असून, एकट्या वनरक्षकाला आरोपींच्‍या वाहनात बसवून कार्यालयाकडे पाठविले गेले होते. यातून वनरक्षकाच्‍याही जिवाला धोका होऊ शकला असता. विशेष म्‍हणजे हा वनरक्षक निशस्‍त्र होता. यातून वनपालांच्‍याही कार्यपद्धतीवर आश्चर्य व्‍यक्‍त होत आहे.

अर्जुन रामराव खेडकर (25) हे मागील दीड वर्षापासून जळगाव जामोदच्‍या वनपरीक्षेत्र कार्यालयात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्‍यांच्‍याकडे निमखेडी बिटचा कार्यभार आहे. काल, 6 जूनला ते आणि वनपाल प्रविण सानप शासकीय वाहनाने जळगाव जामोद ते वडशिंगी रोडने पेट्रोलिंग करत असताना रात्री आठच्‍या सुमारास त्‍यांना लाकडांनी भरलेले 407 वाहन (क्रमांक एमएच 16 क्‍यू 942) वडशिंगीवरून येताना दिसले. वाहन थांबवून वन कर्मचाऱ्यांनी चालकाकडे वाहनाचा परवाना विचारला असता त्‍याने परवाना नसल्याचे सांगितले. त्‍यानंतर वनपाल सानप यांनी वनरक्षक खेडकर यांना वाहन पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यास सांगितले. खेडकर हे वाहनात बसून चालक युसूफसोबत (पूर्ण नाव तक्रारीत जळगाव जामोदकडे येत असताना निंभोरा फाट्यावर एक मोटारसायकलीवर तिघे आले. त्यांनी टाटा 407 वाहन थांबवले. मोटारसायकलीवर शेख महंमद अब्दुल अहमद (रा. सुलतानपुरा, ता. जळगाव जामोद) व इतर दोघे आले. शेख महंमद अब्दुल अहमद याने कॉलर पकडून उतरले व शिविगाळ सुरू केली. चापटबुक्‍क्यांनी मारहाण केली करत ते टाटा 407 वाहन घेऊन गेले. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

एकट्यालाच आरोपींच्‍या वाहनात बसवणे किती योग्‍य?
लाकडाचे वाहन पळविण्याचा संपूर्ण घटनाक्रमच आश्चर्यस्‍पद आहे. वनपालांनी एकट्या वनरक्षकाला आरोपीच्‍या वाहनात बसवणे, मध्येच मोटारसायकलवर तिघे येणे आणि त्‍यांनी वाहन अडवणे (!), त्‍यांनी वनरक्षकालाच वाहनातून उतरवून मारहाण करत वाहन पळवून नेणे अनेक प्रश्न निर्माण करत आहे. यातून वनकर्मचारी लाकूड तस्‍करांशी लढण्यास किती असमर्थ आहेत हेच दिसून येते. जवळ कोणतेही शस्‍त्र नसताना आरोपींच्‍या वाहनात बसणेही धोकादायकच होते. तरीही वनपालांचा आदेश म्‍हणून खेडकर हे वाहनात बसले. सुदैवाने त्‍यांच्‍या जिवाचे बरेवाईट आरोपींना केले नाही, असेच म्‍हणावे लागेल. या घटनेची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेण्याची गरज आहे.