इतकं क्षुल्लक कारण होतं… आधी पती-पत्‍नीत राडा, मग दोन कुटुंब भिडले!; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारण अगदीच क्षुल्लक होतं.. इतकं की तुम्हीही म्हणाल की ही काय भांडणाचं कारण होतं का…? पण या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत भांडण झालं.. पत्नीने ते माहेरापर्यंत नेलं अन् मग दोन्ही कुटुंब भिडले. यात एक जखमी तर बाकीच्यांना मुक्का मारला लागला आहे. ही घटना काल, 31 मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कारण अगदीच क्षुल्लक होतं.. इतकं की तुम्‍हीही म्‍हणाल की ही काय भांडणाचं कारण होतं का…? पण या क्षुल्लक कारणावरून पती-पत्‍नीत भांडण झालं.. पत्‍नीने ते माहेरापर्यंत नेलं अन्‌ मग दोन्‍ही कुटुंब भिडले. यात एक जखमी तर बाकीच्यांना मुक्‍का मारला लागला आहे. ही घटना काल, 31 मे रोजी रात्री सव्वा दहाच्‍या सुमारास दहिगाव (ता. नांदुरा) येथे घडली.

कुंदन नामदेव सोनोने (34, रा. दहिगाव) हे किराणा दुकान चालवतात. ते आज, 1 जूनला वडील नामदेव सोनोने, बहिण सौ. सुनिता दिलीप गावंडे, मामा भिमराव महादेव गावंडे, आई सौ. जिजाबाई नामदेव सोनोने यांच्‍यासह नांदुरा पोलीस ठाण्यात आले व तक्रार दिली. तक्रारीत त्‍यांनी म्‍हटले आहे, की काल संध्याकाळी माझी लहान मुलगी ईश्वरी (3) माझ्याजवळ झोपलेली होती. तेव्‍हा पत्‍नी सौ. मेघा ही ईश्वरीला माझ्याजवळून तिच्‍याजवळ बोलावत होती. मात्र मुलगी तिच्‍याजवळ गेली नाही. त्यामुळे पत्‍नीने तिला उचलून घेऊन जात थापड मारली. मी व माझी आई पत्‍नीला समजावून सांगत तिने उलटसुलट बोलायला सुरुवात केली. त्‍यामुळे वाद वाढला. तिने माहेरी फोन केला. त्‍यानंतर तिचा भाऊ किशोर महादेव सपकाळ, वडील महादेव सपकाळ व पत्‍नीचा नातेवाइक बंडू शिंदे व आमचे गावातील संतोष सोनोने हे रात्री सव्वा दहाच्‍या सुमारास माझ्या घरी आले.

माझ्या बहिणीला का मारले, असे म्हणून साळा किशोर सपकाळ याने माझ्या वडिलांना लोटपाट केली. त्याने व त्याच्‍यासोबत आलेल्‍या महादेव सपकाळ, बंडू शिंदे, संतोष सोनोने व पत्‍नी सौ. मेघाने लाथाबुक्‍क्यांनी आम्हास मारहाण करण्यास सुरुवात केली. किशोरने माझे मामा भिमराव महादेव गावंडे यांच्‍या डोक्यात काठीने मारून जखमी केले व शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पत्‍नी मेघा, साळा किशोर, सासरे महादेव, बंडू शिंदे व संतोष सोनोने यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. या प्रकरणात सौ. मेघानेही तक्रार दिली असून, तिच्‍या तक्रारीवरून पती कुंदन सोनोने, सासरे नामदेव सोनोने, नणंद सौ. सुनिता गावंडे, रघु गावंडे, भिमा गावंडे, आकाश बघे, राजेश बघे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.