‘इतकेच मला जाताना कळले होते, मरणाने केली सुटका, जीवनाने छळले होते…!; स्मशानभूमीतील विदारक चित्र; नगरपालिका कर्मचारी करताहेत ‘त्यांच्यावर’ अंतिमसंस्कार!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इतकेच मला जाताना कळले होते, मरणाने केली सुटका, जीवनाने छळले होते!.. मराठी गझलकार तथा सुरेश भट यांच्या गझलमधील या अर्थपूर्ण पंक्ती कोरोनाच्या महासंकटात लागू होत आहेत. बुलडाणा शहरातील शासकीय वा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे दगावणाऱ्या दुर्दैवी जीवावर बुलडाणा नगरपरिषद कर्मचारी वा क्वचित प्रसंगी सामाजिक कार्यकर्तेच अंतीमसंस्कार करत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः इतकेच मला जाताना कळले होते, मरणाने केली सुटका, जीवनाने छळले होते!.. मराठी गझलकार तथा सुरेश भट यांच्या गझलमधील या अर्थपूर्ण पंक्ती कोरोनाच्या महासंकटात लागू होत आहेत. बुलडाणा शहरातील शासकीय वा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे दगावणाऱ्या दुर्दैवी जीवावर बुलडाणा नगरपरिषद कर्मचारी वा क्वचित प्रसंगी सामाजिक कार्यकर्तेच अंतीमसंस्कार करत असल्याचे  विदारक चित्र आहे.

कोरोनाविरुद्ध बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे अन्‌ त्यांचे सहकारी कर्मचारी दोनेक वर्षांपासून प्राणपणाने लढा देत आहेत. कोरोनाचा धोका पत्करून अगदी कंटेंटमेन्ट झोन तयार करणे, दैनंदिन साफसफाई, पाणीपुरवठा, स्वछता, फवारणी, दंडात्मक कारवाया अशा सर्व कारवाईत पालिका तत्पर आहे. दैनंदिन कामे वेगळीच,  शहरात सध्या हायड्रोक्लोराईड फवारणी सुरू आहे. फायर ब्रिगेड व 5 छोटे ट्रॅक्टर यांच्या मदतीने प्राभागनिहाय ही फवारणी सुरू आहे. सर्व वॉर्डांत कचरा घंटागड्या दौडताहेत. लॉकडाऊन… दंडात्मक कारवाई व निर्देशांचे पालन यासाठी 5 पथके गठीत करण्यात आली असून, यातील 2 पथके फिरती आहेत. शहरातील शासकीय कोविड रुग्णालय परिसराची साफसफाई, लसीकरण मोहिमेमध्येही पालिका आपला सहभाग देत आहे.

स्वार्थी जग अन्‌ अंतिमसंस्कार…

दरम्यान कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींवर अंतीमसंस्कारसाठी अगदी पोटचा गोळा,  सगेसोयरे, नातेवाईक सुद्धा धजावत नाहीत ही दुर्दैवी बाब लक्षात घेऊन पालिकेने इकबालनगर परिसर व संगम तलाव परिसरातील स्मशानभूमीसाठी 2 पथके गठीत केली आहेत. एका पथकात 8 कर्मचारी आहेत. मात्र कधीकधी 13 कधी 15 कोरोना बळींवर अंतीमसंस्कार करण्याची पाळी येते, अशावेळी जास्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागते, ही राख सावडायला कुणीच येत नसल्याने अखेर नुकतेच मुख्याधिकारी वाघमोडे यांनी नुकतेच कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्मशानभूमीची स्वच्छता केली.

घायाळ, पण मैदान सोडले नाही…

दरम्यान कोरोनाशी दोन हात करताना बुलडाणा पालिकेच्या  तब्बल तीसेक कर्मचाऱ्यांना लागण झाली. मात्र बरे झाल्यावर ते सर्व पुन्हा कोरोनाशी लढायला तयार झाले. मागचे विसरून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झालेत. पालिका व कर्मचाऱ्यांची ही मानवीय भूमिका कौतुकास्पद व तितकीच अभिनंदनास्पद आहे.