इलेक्शन साईड इफेक्ट : देऊळघाटला उमेदवाराच्या घरावर हल्ला, नांदुर्‍यात दोन गटांत हाणामारी, भाजप नेते चोपडेंसह चौघांविरुद्ध गुन्हा, मेहकर तालुक्यातही गालबोट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असतानाच सायंकाळी या शांततेला गालबोट लावलेच. देऊळघाट येथे शंभर ते दीडशे जणांनी एकत्र येत एका उमेदवाराच्या घरावर हल्ला चढवला. गाड्यांची तोडफोड केली. 15 जानेवारीला रात्री ही घटना घडली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील कोळंबा (रसूलपुरा) येथे विरोधी उमेदवाराच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला असतानाच सायंकाळी या शांततेला गालबोट लावलेच. देऊळघाट येथे शंभर ते दीडशे जणांनी एकत्र येत एका उमेदवाराच्या घरावर हल्ला चढवला. गाड्यांची तोडफोड केली. 15 जानेवारीला रात्री ही घटना घडली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील कोळंबा (रसूलपुरा) येथे विरोधी उमेदवाराच्या भावास मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप नेते बलदेवराव चोपडे यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देऊळघाटमध्ये पोलीस बंदोबस्त

देऊळघाटमध्ये 17 जागांसाठी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. मतदान आटोपल्यानंतर एका गटाचे उमेदवार व कार्यकर्ते मोमीनपुरा वॉर्ड क्रमांक 4 चे उमेदवार व माजी सरपंच मुश्ताक अहमद यांच्या घरी बसून चर्चा करत होते. त्याचवेळी विरोधी गटातील शंभर ते दीडशे जणांचा जमाव त्यांच्यावर चाल करून आला. लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविण्यात आला. मुश्ताक अहमद यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यात सईद खान गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी घरासमोरील तीन दुचाकीवर खुर्च्यांची मोडतोड केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार सारंग नवलकर तातडीने सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत त्यांनी बंदोबस्त तैनात केला. पोलिसांना पाहताच हल्लेखोर पळून गेले होते. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

नांदुरा ः चौघांनाही अटक

कोळंबा (रसुलपूर) येथे 14 जानेवारीच्या सायंकाळी घडलेल्या घटनेप्रकरणी प्रदीप सोपान दांडगे याने तक्रार दिली की, माझा भाऊ विशाल दांडगे हा रुपेश राहणेसोबत घरी जात असताना बलदेव चोपडे व शेषराव भिडे तिथे आले. त्यांनी विशालला बोलावत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. शेषराव भिडेनेही शिविगाळ केली. त्यावरून पोलिसांनी बलदेवराव चोपडे व भिडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. भिडे यांनीही तक्रार दिली असून, त्यात म्हटले आहे, की मतदान प्रतिनिधीसाठी अर्ज भरण्याकरिता गेलो असता विशाल दांडगे व त्याचा भाऊ प्रदीपने शिविगाळ करून लोटपोट केली. प्रदीपने खिशातील 5 हजार रुपये काढून घेतले. त्यावरून पोलिसांनी विशाल व प्रदीप दांडगेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील चौघांनाही ताब्यात घेतले मात्र चोपडे यांनी प्रकृती बिघाड झाल्याचे सांगितल्याने खामगावच्या सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. बाकी तिघांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कासारखेडमध्ये मतदानावरून वाद

कासारखेड (ता. मेहकर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान दरम्यान एका महिलेच्या मतदान करण्याच्या कारणावरून वाद झाला. परस्परविरोधी तक्रारीवरून दोघांविरुद्धही जानेफळ पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. कासारखेड येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुुकीच्या मतदानासाठी एक महिला आली असता त्या महिलेस तुझे मतदान मी करतो, असे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार असलेल्या संतोष बबनराव मवाळ याने म्हटले. त्याला दुर्गादास रुपराव धोंडगे (28) याने विरोध करत ती महिला वृद्ध किंवा अपंग नाही. तिचे मतदान तिलाच करू द्या, असे म्हटले म्हणून संतोष बबनराव मवाळ व मधुकर सुपाजी मवाळ (दोघे रा. कासारखेड) यांनी तिचेही मतदान आम्हीच करणार आणि तुझेही मतदान आम्हीच करू, अशी धमकी देत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुसर्‍या तक्रारीनुसार निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच संतोष बबनराव मवाळ याच्यासोबत दुर्गादास रुपराव धोंडगे व सतीश दादाराव सवडदकर हे विविध कारणांवरून वाद घालत होते. तसेच आज मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जात असताना त्यास पाहून दोघे शिवीगाळ करत असताना तुम्ही मला शिविगाळ कशाबद्दल करत आहात असे विचारले म्हणून दुर्गादास रुपराव धोंडगे याने गालात चापट मारली व जीवे मारण्याची धमकी दिली. तपास ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गणेश डव्हळे करीत आहेत.