उतावळी धरणाच्या सांडव्यात बुडून तरुणाचा मृत्‍यू; मेहकर तालुक्‍यातील घटना, आज सकाळी सहाला आढळला मृतदेह

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शाजवळील उतावळी प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा सांडव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल, १३ सप्टेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र पावसामुळे अडथळा येत होता. शोधकार्य थांबवून आज, १४ सप्टेंबरला सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. सकाळी सहाला …
 
उतावळी धरणाच्या सांडव्यात बुडून तरुणाचा मृत्‍यू; मेहकर तालुक्‍यातील घटना, आज सकाळी सहाला आढळला मृतदेह

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्‍यातील देऊळगाव साकर्शाजवळील उतावळी प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा सांडव्यात बुडून मृत्‍यू झाला. ही घटना काल, १३ सप्‍टेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र पावसामुळे अडथळा येत होता. शोधकार्य थांबवून आज, १४ सप्‍टेंबरला सकाळी पुन्‍हा सुरू करण्यात आले. सकाळी सहाला मृतदेह मिळून आला.

धीरजसिंग राममोहनसिंग ठाकूर (२२, रा. एकतानगर) हा आपले मित्र इमरान हैदर अली (३०), अन्वर खान हापिज खान (३२), जुगल जांगिड (४०) या तीन मित्रांसह उतावळी प्रकल्‍प पाहण्यासाठी आला होता. प्रकल्पाच्‍या सांडव्यात ते उतरले असता पाय घसरून तो सांडव्याच्‍या डोहात पडला. मित्रांनी आरडाओरड करेपर्यंत पूर्णपणे तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच सरपंच संदीप अल्हाट, तलाठी बी. एम. माने, पोलीस पाटील गजानन पाचपोर, सागर पायघन, शैलेश राठोड, रमेश काळे यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले.

रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र पावसामुळे अडथळे येत असल्याने आज सकाळी शोधकार्य सुरू केले असता मृतदेह मिळून आला. उतावळी प्रकल्पाला सध्या भेट देणाऱ्यांची संख्या वाढली असून, असुरक्षित पद्धतीने अनेक जण वावरत असल्याने धोक्‍याची शक्‍यता यापूर्वीच ग्रामस्‍थांनी वर्तवली होती. मात्र स्‍थानिक प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने आज एक बळी गेल्याची चर्चा ग्रामस्‍थांत आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून घोषित करण्याची मागणी होत आहे.