उद्योगासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरा; आमदार सौ. श्वेताताई महाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याने उद्योगासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे. रुग्णांना अत्यंत गरज असताना सुद्धा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेले आहेत. एकीकडे रेमेडीसिविर या इंजेक्शनचा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याने उद्योगासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.

रुग्णांना अत्यंत गरज असताना सुद्धा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेले आहेत. एकीकडे रेमेडीसिविर या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा तर दुसरीकडे ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्ण तडफडून मरत आहेत. परंतु रेमेडीसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन पुरविण्याबाबत आतापर्यंत तरी शासन व्यवस्था अपुरी पडत असल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. राज्यभरात उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येते. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने असून, ऑक्सिजन केवळ उद्योगासाठी वापरला जातो. सद्यःस्थितीत असणाऱ्या कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा कितीतरी पटीने उद्योगात ऑक्सिजन निर्मिती होत आहे. आजच्या स्थितीमध्ये माणसाला ऑक्सिजनची नितांत गरज असून ते मिळत नसल्याने माणसे मरत आहेत. उद्योग इंडस्ट्रीमध्ये निर्मिती होणारा ऑक्सिजन हा आरोग्याकडे वळती करून राज्यभरातील गरजू कोरोना बाधित व इतर रुग्णांसाठी वापरण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे . प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठे उद्योग असून बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती सुद्धा होते. राज्यभरात ररोज हजारोने कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आताच आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण सहन होत नसल्याने यंत्रणा कोलमडून पडली आहे. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जाणार आहे अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे इतर आरोग्य विषयक सुविधांसोबतच ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शक्यता नाकारता येत नाही. हा प्रश्न जीवन मरणाचा असल्याने अगोदर जीव वाचविण्यासाठी प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योग बंद पडले तरी चालेल पण माणसाला वेळेवर ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहे. त्‍यामुळे उद्योगासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरण्यात यावा अन्यथा या साथीच्या रोगात मृत्यूचे थैमान पहावले जाणार नाही, असा इशारा सुद्धा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी दिला आहे.