उपचारासाठी औरंगाबादला गेलेल्या लोणारच्या शेतकऱ्याचे १ लाख रुपये बसमधून लांबवले!

लोणार/औरंगाबाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दम्याचा आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबादला जात असलेल्या लोणार तालुक्यातील शेतकऱ्याचे १ लाख रुपये अनोळखी भामट्यांनी लांबवले. ही बाब औरंगाबादला चिकलठाणा येथे बस पोहोचल्यावर शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्याने औरंगाबादेतील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी २ पुरुष व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद सखाराम नन्हेरे (५६, …
 
उपचारासाठी औरंगाबादला गेलेल्या लोणारच्या शेतकऱ्याचे १ लाख रुपये बसमधून लांबवले!

लोणार/औरंगाबाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दम्याचा आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबादला जात असलेल्या लोणार तालुक्यातील शेतकऱ्याचे १ लाख रुपये अनोळखी भामट्यांनी लांबवले. ही बाब औरंगाबादला चिकलठाणा येथे बस पोहोचल्यावर शेतकऱ्याच्‍या लक्षात आली. त्‍याने औरंगाबादेतील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून अनोळखी २ पुरुष व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रल्हाद सखाराम नन्हेरे (५६, रा. पिंप्री खंदारे ता. लोणार) यांना दम्याचा आजार आहे. उपचारासाठी त्यांनी शेतीच्या व्यवसायातून १ लाख रुपये जमवले होते. औरंगाबाद येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार घ्यायचे होते. उपचारासाठी ते १० ऑगस्टला सकाळी ११ च्या सुमारास देऊळगाव राजा बसस्थानकावरून शेगाव- औरंगाबाद या बसने औरंगाबादसाठी निघाले. सोबत घेतलेले एक लाख रुपये खाकी बॅगमध्ये टाकून ती बॅग सीटच्यावर असलेल्या जाळीच्या रॅकमध्ये टाकली. बस जालन्यात आल्यावर त्यांच्या समोरील सीटवर दोन अनोळखी पुरुष व त्यासमोर एक महिला बसली. बस औरंगाबादच्या केंब्रिज चौकात आल्यावर जालन्यातून बसलेले २ अनोळखी पुरुष व १ महिला उतरली. बस चिकलठाणा येथे आल्यावर प्रल्हाद नन्हेरे यांना ठेवलेल्या ठिकाणी बॅग दिसली नाही. त्यामुळे भांबावलेल्या शेतकऱ्याने बसमधील प्रवाशी व वाहक, चालकाला विचारपूस केली. मात्र कुणाला काहीच माहिती नव्‍हते. जालन्यातून बसलेल्या व केंब्रिज चौकात उतरलेल्या त्या तिघांनीच बॅग लांबवली असल्याची शेतकऱ्याची खात्री झाली. याप्रकरणी शेतकऱ्याने औरंगाबादच्या एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन अनोळखी पुरुष व एका अनोळखी महिलेविरोधात तक्रार दिली आहे.