एकतर्फी प्रेमाची “छळ’कहानी… तिचा डीपी ठेवायचा, पाठलाग करायचा..अखेर केला राडा!; चिखली तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडते म्हणून त्याने मुलीचा वर्षभरापासून छळ मांडला. बदनामी नकाे म्हणून कुटुंबही चूप बसले. त्याच्या घरच्यांना सांगितले… अति झाले म्हणून पोलिसांनाही सांगितले. पोलिसांनीही त्याला समजावून सांगितले. काही दिवस त्याच्या वागण्यात फरक पडला.. पण पुन्हा जैसे थे… तिचा पाठलाग करायचा. तिच्या फोटो डीपी ठेवण्याचे त्याचे प्रताप …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडते म्‍हणून त्‍याने मुलीचा वर्षभरापासून छळ मांडला. बदनामी नकाे म्‍हणून कुटुंबही चूप बसले. त्‍याच्‍या घरच्‍यांना सांगितले… अति झाले म्‍हणून पोलिसांनाही सांगितले. पोलिसांनीही त्‍याला समजावून सांगितले. काही दिवस त्‍याच्‍या वागण्यात फरक पडला.. पण पुन्‍हा जैसे थे… तिचा पाठलाग करायचा. तिच्या फोटो डीपी ठेवण्याचे त्‍याचे प्रताप सुरूच होते. वैतागून तिला तिच्‍या वडिलांनी भावाकडे राहायला पाठवले. मात्र तिथेही जाऊनही त्‍याचे कारनामे सुरूच… अखेर व्हायचे तेच झाले. काल, १२ जुलैला तिच्‍या वडिलांनी त्‍याला भावाच्‍या घराकडे फिरताना पाहिले आणि पकडून जाब विचारला. त्‍याचा राग येऊन त्‍याच्‍या घरच्यांनी तिच्‍या वडिलांवर हल्ला करून मारहाण रात्री आठच्‍या सुमारास मारहाण केली. या प्रकरणी आज, १३ जुलैला अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना महीमळ (ता. चिखली) येथे घडली.

वसंता दगडू येवले, अमोल वसंता येवले, शरद वसंता येवले (सर्व रा. महीमळ) अशी आरोपींची नावे आहेत. महीमळ येथील ५३ वर्षीय व्‍यक्‍तीने तक्रार दिली, की त्‍यांच्‍या घरासमोर वसंता दगडू येवले राहतो. त्‍याचा मुलगा अमोल हा माझ्या मुलीला वर्षभरापासून त्रास देत आहे. तिच्या मोबाइलवर तू मला आवडते… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे मेसेज करतो. मुलीने ही बाब वारंवार घरात सांगितली. त्‍यामुळे आम्‍ही त्‍याच्‍या आई-वडिलांना याबाबत सांगितले. मात्र तरीही अमोलच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याने त्‍याच्‍या मोबाइल फोनवर माझ्या मुलीचा डीपी ठेवून बदनामी केली. अमडापूर पोलीस ठाण्यात आम्‍ही तक्रार करण्यासाठी गेलो असता अमोल आणि त्‍याच्‍या घरच्यांना बोलावण्यात आले. तिथे त्‍याला ठाणेदारांनी समजावून सांगितले. त्‍यामुळे १५ ते २० दिवस त्‍याच्‍या वागण्यात फरक पडला. मात्र नंतर त्‍याने पुन्‍हा पाठलाग सुरू केला. तिच्‍या मोबाइलवर फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली. त्‍यामुळे वैतागून तिला काकाकडे पाठविले. तिथेसुध्दा अमोल चकरा मारू लागला. तिचा पाठलाग करू लागला, असे तक्रारीत म्‍हटले आहे. पीडित मुलीच्‍या वडिलांनी तक्रारीत पुढे म्‍हटले आहे, की १२ जुलैला दुपारी १२ वाजता चिखली येथे सोमवार बाजार असल्याने बाजार करण्यासाठी गेलो असता अमोलही त्‍यांच्‍या भावाच्‍या घराकडे फिरताना दिसला. मुलीने सांगितले की तो इकडे नेहमी चकरा मारतो व त्रास देतो. त्‍यामुळे मी अमोलला भेटलो व विचारले, की तू परत मुलीला का त्रास देतोय? तुला पोलिसांनी समजावून सांगितलेय ना… त्‍यामुळे तो तिथून निघून गेल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

…मग केला हल्ला
पीडित मुलीचे वडील चिखली येथून सायंकाळी साडेसातला घरी महीमळ येथे आले. शेतात जनावरांना चारापाणी करून व दूध काढून ट्रॅक्टर रात्री आठला घेऊन तलावाचे रस्त्याने येत असताना त्‍यांना वसंता दगडू येवले, अमोल वसंता येवले, शरद वसंता येवले यांनी अडवले. शिविगाळ करून तुझ्या मुलीला आम्ही पळून घेऊन जाऊ, असे अमोल म्‍हणाला. वसंता येवले याने लोटपाट करून त्‍यांच्‍या मनगटाला चावा घेतला. अमोलने तुला आज जिवाने मारून टाकतो म्‍हणून काठीने मारहाण करू लागला. याचवेळी गावातील पंढरी चेके यांनी भांडण पाहिले व पीडितेच्‍या वडिलांची सुटका केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे.