एकहाती सत्तेचे आवाहन करताना खासदार विसरले मागील किरकोळ कामगिरी! स्वबळावर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली होती शिवसेना!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खासदार तथा जिल्हा शिवसेनेचे सर्वेसर्वा प्रतापराव जाधव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत एकहाती सत्ता हस्तगत करण्याचे आवाहन केले. याचाच दुसरा अर्थ शिवसेना या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मात्र हे आवाहन करताना व कथित आढावा घेताना खासदारांना मागील निवडणुकीतील किरकोळ कामगिरीचा विसर …
 
एकहाती सत्तेचे आवाहन करताना खासदार विसरले मागील किरकोळ कामगिरी! स्वबळावर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली होती शिवसेना!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खासदार तथा जिल्हा शिवसेनेचे सर्वेसर्वा प्रतापराव जाधव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्‍य संस्‍था निवडणुकांत एकहाती सत्ता हस्तगत करण्याचे आवाहन केले. याचाच दुसरा अर्थ शिवसेना या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मात्र हे आवाहन करताना व कथित आढावा घेताना खासदारांना मागील निवडणुकीतील किरकोळ कामगिरीचा विसर पडला की काय, असा मजेदार पण रोखठोक सवाल उपस्थित झाला आहे. जिल्हा शिवसेनेचे राजकीय व संघटनात्मक पोस्टमार्टेम करणाऱ्या त्या निकालाचा अन्‌ सध्याच्याही राजकीय स्थितीचा विचार न करताच केलेली ही घोषणा कितपत रास्त, असा प्रश्न या निमित्ताने राजकीय वर्तुळात व्‍यक्‍त केला जात आहे.

खासदार, किमान दोन आमदार, जिल्हा प्रमुख, सरदारांसारखे वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भरमार अन्‌ निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज, सहकार क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, हाती असलेल्या बाजार समित्या अशी शिवसेनेची ताकद आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात असलेले संघटनेचे नेटवर्क, स्व. बाळासाहेब ठाकरेंना मानणारे व त्यांच्यामुळे धनुष्याला मतदान करणारे अराजकीय चाहते या बाबी सेनेला अन्य पक्षांपेक्षा वेगळ्या ठरविणाऱ्या, इतर पक्षाच्या तुलनेत गटबाजी देखील कमी अन्‌ असली तरी त्याचा मतदानावर फरक होत नाही हे एक वैशिष्ट्य! जिल्हा शिवसेना म्हणजे प्रतापराव बोले अन्‌ दल हाले अशी स्थिती. मात्र हे सर्व असतानाही सन २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेची कामगिरी का खालावली अन्‌ तिसऱ्या क्रमांकापर्यंत घसरण का झाली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नच झाला नाही. किंबहुना त्यावर उपाययोजना करण्याची गरजही वाटली नसावी.

नगर परिषद, नगरपंचायतीच्या ३०१ पैकी जेमतेम ५१ जागा जिल्हा परिषदेच्या ६० पैकी ९ तर १३ पंचायत समित्यांच्या १२० पैकी केवळ २६ जागा पक्षाच्या वाट्यावर आल्या. यावर कळस म्हणजे जिल्हा परिषदेत जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव या तालुक्यात धनुष्याला एकाही जागेचा ( विजयाचा) वेध घेता आला नाही. देऊळगाव माळी मतदारसंघातून “युवराज’ ऋषी प्रतापराव जाधव यांचा झालेला पराभव नेत्यांना अनेक इशारे देणारा ठरला. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक लढतीत स्वबळावर लढताना यामुळे पक्षाचे बेहाल झाले. यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नसल्याने येत्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुका खासदारांची पुन्हा अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यांनी एकहाती सत्तेची स्वप्ने जरूर पहावी, कार्यकर्त्यांना दाखवावी, पण स्वप्न अन्‌ सत्य, कल्पना अन्‌ वास्तव यात खूप फरक राहतो याचे राजकीय भान ठेवणे गरजेचे आहे. जिल्हाभरात पक्ष स्ट्राँग झाला तर पुढील लोकसभेत आव्हान टिकेल, याचे कारण त्यावेळी भाजप त्यातही नरेंद्र मोदी या नावाच्या झंझावाताची सोबत नसणार आहे. यामुळे अतिशयोक्ती मानली तरी या निवडणुका पुढील लोकसभेची रंगीत तालीम म्हणता येईल. स्वबळावरील लोकसभेसाठीची तयारी करण्याची दिशा या निवडणुकातून मिळणार आहे.