एकाने आजाराला कंटाळून, दुसऱ्याने रोजगार नसल्याने कवटाळले मरण!; खामगाव, देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

खामगाव/देऊळगाव राजा (भागवत राऊत/राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना समोर आल्या असून, खामगाव तालुक्यातील पातोंडा शिवारातील शेतात 65 वर्षीय वृद्धाने तर देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बायगाव येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सिध्दार्थ डिगांबर खरात (40) असे आहे. वडील नसल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी कमी …
 

खामगाव/देऊळगाव राजा (भागवत राऊत/राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आत्‍महत्‍येच्‍या दोन घटना समोर आल्या असून, खामगाव तालुक्‍यातील पातोंडा शिवारातील शेतात 65 वर्षीय वृद्धाने तर देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव येथील शेतकऱ्याने स्‍वतःच्‍या शेतात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

बायगाव येथे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सिध्दार्थ डिगांबर खरात (40) असे आहे. वडील नसल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी कमी वयात त्यांच्‍यावर पडली होते. त्यांच्या आईच्या नावे दोन एकर शेती जमीन आहे. परंतु या शेतीवर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नव्‍हता. ते लोकांच्या शेतात मोलमजुरी करून कुटूंबाचा गाडा चालवत होते. मात्र सध्या हाताला काम नाही. कुटुंब कसे चालवायचे या नैराश्यातून त्यांनी जीवनयात्रा संपवल्‍याचे त्‍यांच्‍या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. ही घटना आज, 14 मे रोजी सकाळी समोर आली. त्यांच्या पश्चात आई, एक मुलगा, दोन मुली, पत्‍नी असा परिवार आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.

दुसऱ्या घटनेतील आत्‍महत्‍या केलेल्या वृद्धाचे नाव पंढरी सूर्यभान शिंदे (रा. पातोंडा, ता. खामगाव) असे आहे. त्‍यांना किडनी व पोटाचा आजार होता. या आजाराला कंटाळून त्‍यांनी आत्‍महत्‍या केल्याचे त्‍यांच्‍या मुलाने पोलिसांत दिलेल्या माहितीत म्‍हटले आहे. त्‍यांनी शेतातील निंबाच्‍या झाडाला गळफास घेतला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.