‘एलसीबी’ची मोठी कारवाई; महागड्या मोटारसायकल चोरट्यांची मोठी टोळी गजाआड; 2 देशी कट्ट्यांसह साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त!

बुलडाणा ( कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि पुणे जिल्ह्यातून बुलेट, शाईन, एचएफ डिलक्ससारख्या महागड्या मोटारसायकली चोरून त्याची विक्री करणारी टोळी आज, 22 फेब्रुवारीला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गजाआड केली. त्यांच्याकडून 2 देशी कट्ट्यांसहीत 13 मोटारसायकली असा एकूण 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीतील 5 जणांना अटक …
 

बुलडाणा ( कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि पुणे जिल्ह्यातून बुलेट, शाईन, एचएफ डिलक्ससारख्या महागड्या मोटारसायकली चोरून त्याची विक्री करणारी टोळी आज, 22 फेब्रुवारीला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गजाआड केली. त्यांच्याकडून 2 देशी कट्ट्यांसहीत 13 मोटारसायकली असा एकूण 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीतील 5 जणांना अटक केली असून, त्यांनी तब्‍बल 17 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. याच प्रकरणात चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या 3 जणांनाही अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी चोरलेल्या 17मोटारसायकलीपैकी 13 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे ‘एलसीबी’ने सोमनाथ बाबुराव साळवे (30, रा. डोंगरशेवली, ह.मु. मांजरी खुर्द , ता. हवेली, जि. पुणे) याला वरवंड फाटा (ता. बुलडाणा) येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 2 देशी कट्टे, 7 जिवंत काडतुसे, 1 होंडा ॲक्टिव्हा स्‍कूटी, 1 मोबाइल असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशी केली असता त्याने ताब्यातील स्‍कूटी व मोबाईल पुणे जिल्ह्यातून चोरल्याची कबुली दिली. याशिवाय त्याचे साथीदार गोपाल कोंडू चव्हाण (21), मयूर अनिल राठोड (20), शैलेश सुरेश जाधव (20, तिघेही रा. डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा), मंगेश बबन जेऊघाले (22, रा. वरवंड ता. बुलडाणा) यांनाही ताब्यात घेतले. त्यांनी मागील वर्षभरात बुलडाणा व पुणे जिल्ह्यातून एकूण17 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकींमध्ये 9 रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 सीसी बुलेट गाड्यांचा समावेश आहे. शिवाय बजाज पल्सर, होंडा शाईन, एचएफ डिलक्स गाड्याही चोरट्यांनी चोरल्याची कबुली दिली.
त्‍यांच्‍याकडून 2 देशी कट्टे, 7 जिवंत काडतुसे, 1 मोबाईल फोन सह 13 मोटारसायकली असा एकूण 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, प्रदीप आढाव, पोलीस अंमलदार सुधाकर काळे, दीपक पवार, सुनील खरात, गणेश शेळके, युवराज शिंदे व चालक राहुल बोर्डे यांनी पार पाडली.