प्रेमाच्‍या त्रिकोणातून एसटी वाहक माधुरीची गळा चिरून हत्‍या; अंत्री खेडेकर शिवारातील खळबळजनक घटना; खून करणाऱ्या ‘माजी’ प्रियकराला अटक, ‘आजी’ प्रियकर चौकशीसाठी ताब्‍यात

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रेम प्रकरणातून घटस्फोटित तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अंत्री खेडेकर (ता. चिखली) शिवारात समोर आली आहे. आज, 16 एप्रिलच्या पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या ग्रामस्थांना अंत्री खेडेकर आणि मेरा खुर्दच्या मध्ये तिचा मृतदेह आढळला. गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशाण मृतदेहावर दिसत असल्याने हा खून …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रेम प्रकरणातून घटस्‍फोटित तरुणीची गळा चिरून हत्‍या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अंत्री खेडेकर (ता. चिखली) शिवारात समोर आली आहे. आज, 16 एप्रिलच्‍या पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या ग्रामस्‍थांना अंत्री खेडेकर आणि मेरा खुर्दच्‍या मध्ये तिचा मृतदेह आढळला. गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशाण मृतदेहावर दिसत असल्याने हा खून असल्याचे स्‍पष्ट झाले होते. अवघ्या काही तासांत अंढेरा पोलिसांनी या घटनेचे गूढ उकलले असून, आरोपीला अटकही केली आहे.

माधुरी भीमराव मोरे (25, रा. अंत्री खेडेकर, ता. चिखली) असे या खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती एसटी बस वाहक म्‍हणून बुलडाणा आगारात कार्यरत होती. तिच्‍या खुनाच्‍या आरोपाखाली पोलिसांनी अनिल भोसले (32) याला ताब्‍यात घेतले आहे. परवा माधुरीचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्‍यानुसार साखळी (ता. बुलडाणा) येथे मावशीच्‍या घरी ती मुक्‍कामी होती. काल ड्युटी करून आज तिची आठवडी सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होती. मात्र थेट मृतदेहच भल्‍या पहाटे अंत्री खेडेकरच्‍या शिवारात आढळला. मृतदेह संशयास्‍पद अवस्‍थेत असल्याने खून झाल्‍याचे निष्पन्‍न झाले होते. भल्‍या पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या ग्रामस्‍थांना मृतदेह दिसल्यानंतर त्‍यांनी गावात ही माहिती दिली. त्‍यानंतर पोलीस पाटलांनी अंढेरा पोलिसांना ही माहिती दिली. तातडीने ठाणेदार राजरत्‍न आठवले यांनी पथकासह घटनास्‍थळी धाव घेतली. खून असल्याने बुलडाण्यावरून श्वानपथक व ठसेतज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

माधुरीचा 5 वर्षांपूर्वी घटस्‍फोट झाला होता. यापूर्वी ती जाफराबाद आगारात कार्यरत होती. तिथे असताना अनिल भोसलेशी तिची ओळख वाढली आणि त्‍यातून प्रेम प्रकरणही सुरू झाले. काही दिवसांपूर्वी तिची बदली बुलडाणा आगारात झाली होती. त्‍यामुळे दोघांत अंतर पडले. याच दरम्‍यान माधुरीची ओळख चिखली येथील अरुण काकडे याच्‍यासोबत फेसबुकच्‍या माध्यमातून झाली. त्‍यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. ही बाब अनिलला कळल्‍याने माधुरीसोबत त्‍याचा वाद सुरू झाला. काल 15 एप्रिलला माधुरी बुलडाण्यावरून घरी येत असताना अनिलने तिला मेरा फाट्यावर येऊन घरी सोडतो म्‍हणून दुचाकीवर बसवले. त्‍यांच्‍या पुन्‍हा अरुण काकडेशी संबंधावरून वाद सुरू झाला. त्‍याने गाडी थांबवून तिला रस्‍त्‍याच्‍या बाजूला नेत मारहाण सुरू केली व गळा चिरून तिची हत्‍या केली. अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याने अंढेरा पोलिसांचे कौतुक होत असून, पोलिसांनी अनिलला अटक केली आहे, तर अरुण काकडेला चौकशीसाठी ताब्‍यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.