एसडीओंची बनावट सही, खोट्या शिक्क्याने काढला परवानगी आदेश; बनावट कागदपत्रे बनवून भूखंड खरेदी!; 5 जणांविरुद्ध गुन्हा; नायब तहसीलदारांनी केली होती तक्रार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा उपविभागीय अधिकार्यांचे पदनाम आणि बनावट शिक्का वापरून खोट्या स्वाक्षरीच्या साह्याने भूखंड घशात घालण्याचा डाव चिखलीच्या नायब तहसीलदारांमुळे उधळला गेला आहे. हा भूखंड खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार एच. डी. वीर यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.6 फेब्रुवारीला श्री. वीर यांनी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा उपविभागीय अधिकार्‍यांचे पदनाम आणि बनावट शिक्का वापरून खोट्या स्वाक्षरीच्या साह्याने भूखंड घशात घालण्याचा डाव चिखलीच्या नायब तहसीलदारांमुळे उधळला गेला आहे. हा भूखंड खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार एच. डी. वीर यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 फेब्रुवारीला श्री. वीर यांनी तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, तालुक्यातील दिवठाणा येथील गट नं. 68 मधील 0.47 हे.आर जमिनीपैकी 0.02 हे.आर जमीन गोठ्याकरिता प्रणिता सुमंता मोरे यांनी तेजराव कोंडू मोरे यांच्याकडून लिहून घेतली. दोघेही दिवठाणाचे आहेत. यासाठी त्यांनी बुलडाणा उपविभागीय अधिकार्‍यांची बनावट कागदपत्रे तयार केली. दिवठाणा येथीलच गट नंबर 68 मधील 0.47 हे.आर जमिनिपैकी 0.01 हे.आर जमीन धनंजय नामदेव मोरे याने तेजराव कोंडू मोरे याच्याकडून लिहून घेतली. यासाठी सुद्धा बनावट कागदपत्रे वापरली. या प्रकरणी निवासी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने चौकशी केली. सखोल चौकशीत बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी त्यांना नितीन वसंतराव मेहेत्रे आणि प्रल्हाद जाधव (दोघेही रा. चिखली) यांनी मदत केली. परवानगी आदेश हा बुलडाणा उपविभागीय अधिकार्‍यांचे पदनाम, बनावट शिक्का वापरून काढला. परवानगी आदेशावरील स्वाक्षरी उपविभागीय अधिकार्‍यांची नसल्याची माहिती समोर आली. बनावट शासकीय दस्तऐवज बनविणे फौजदारी गुन्हा असल्याने आरोपींविरुद्ध श्रभ. वीर यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून रात्री उशिरा चिखली पोलिसांनी प्रणिता सुमंता मोरे, तेजराव कोंडू मोरे, धनंजय नामदेव मोरे, नितीन वसंतराव मेहेत्रे व अमोल प्रल्हाद जाधव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.