ऐन मध्यरात्री आला कुणाच्या तरी चालण्याचा आवाज…; अंजनी बुद्रूकमध्ये या घटनेने सध्या उडालीये खळबळ!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री लघुशंकेसाठी उठलेल्या घरमालकाला कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्यांनी खोलीबाहेर येऊन पाहिले असता एक जण गच्चीवरून घरात शिरला होता… चोर चोर म्हणून ओरडाओरड करताच तो पळू लागला. पण घरमालक आणि ग्रामस्थांनी मिळून त्याला पकडला अन् धो धो धुतला… हातपाय बांधून गच्चीवर नेऊन टाकले आणि नाव, गाव विचारले. नंतर त्याला …
 
ऐन मध्यरात्री आला कुणाच्या तरी चालण्याचा आवाज…; अंजनी बुद्रूकमध्ये या घटनेने सध्या उडालीये खळबळ!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री लघुशंकेसाठी उठलेल्या घरमालकाला कुणाच्‍या तरी चालण्याचा आवाज आला. त्‍यांनी खोलीबाहेर येऊन पाहिले असता एक जण गच्चीवरून घरात शिरला होता… चोर चोर म्‍हणून ओरडाओरड करताच तो पळू लागला. पण घरमालक आणि ग्रामस्‍थांनी मिळून त्‍याला पकडला अन्‌ धो धो धुतला… हातपाय बांधून गच्चीवर नेऊन टाकले आणि नाव, गाव विचारले. नंतर त्‍याला डोणगाव पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले. हा खळबळजनक प्रकार मेहकर तालुक्‍यातील अंजनी बुद्रूक येथे काल, ८ ऑक्‍टोबरला पहाटे समोर आला.

मोटार रिवायडिंगचे काम करणारे राजकुमार लक्ष्मण राऊत (रा. अंजनी बुद्रूक) यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिल्यावरून संदीप प्रल्हाद नेव्हल (रा. जयपूर जिरे ता. शेणगाव जि. हिंगोली) या चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांचे गावातच माऊली मोटार रिवायडींग हे दुकान आहे. ७ ऑक्‍टोबरच्या रात्री ते जेवण करून कुटुंबासह झोपले होते. ८ ऑक्‍टोबरला पहाटे चार-साडेचारच्या सुमारास ते लघुशंकेसाठी उठले असता त्‍यांना कुणाच्‍या तरी चालण्याचा आवाज आल्याने चोरट्याचे बिंग फुटले.

राऊत यांनी आरडाओरड केली. त्‍यामुळे त्‍यांची मुले रोहित आणि निखिल हेही झोपेतून उठले. मुलांसह मदतीला धावलेल्या ग्रामस्‍थांनी संदीप नेव्‍हल याला पकडले. चोरटा हातीच लागल्याने ग्रामस्‍थांनीही हात साफ करून घेतला. त्‍याला बेदम चोप देत हातपाय बांधले आणि गच्‍चीवर नेऊन टाकले. तिथे त्‍याची चौकशी सुरू केली. त्‍याने नाव गाव सांगितल्यानंतर पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले. पोहेकाँ मंगेश खडसे हे पोलीस जीपसह गावात आले. त्‍यांनी चोरट्याला ताब्‍यात घेतले.