कंटेनरची दुचाकीला मागून धडक; शेतात पेरणीसाठी निघालेली महिला ठार!; नांदुरा शहराजवळील घटना, खामगावमध्येही सायकलस्वार तरुण अपघातात ठार!!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने शेतात पेरणीसाठी निघालेली महिला जागीच ठार झाली. ही घटना मलकापूर- नांदुरा रोडवरील प्रियांका हॉटेलसमोर आज, ११ जुलैच्या सकाळी अकराच्या सुमारास घडली. गं. भा. कोकिळा मधुकर दळवी (४५, रा. मोतीपुरा ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. घराशेजारील मुलगा हेमंत गोपाळ राणे …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने शेतात पेरणीसाठी निघालेली महिला जागीच ठार झाली. ही घटना मलकापूर- नांदुरा रोडवरील प्रियांका हॉटेलसमोर आज, ११ जुलैच्या सकाळी अकराच्‍या सुमारास घडली.

गं. भा. कोकिळा मधुकर दळवी (४५, रा. मोतीपुरा ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. घराशेजारील मुलगा हेमंत गोपाळ राणे (३२) याच्‍यासोबत त्‍या ॲक्‍टिवा गाडीने पेरणीसाठी शेतात जात होत्‍या. मलकापूर रोडवरील प्रियांका हॉटेलसमोर खामगाववरून मलकापूरकडे भरधाव निघालेल्या कंटेनरने त्‍यांना मागून कट मारल्याने कोकिळाबाई पडल्‍या. यातच त्‍यांच्‍या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. हेमंतच्‍या उजव्या हाताला मुक्का मार लागला आहे. अपघात होताच कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, प्रविण डवंगे, अजय घनोकार, प्रणव एकडे, कृष्णा वसोकार, श्याम जुमडे, पियुष मिहानी,आनंद वावगे यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी येत महिलेचा मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणला. तपास नांदुरा पोलीस करत आहेत.

खामगावमध्ये युवक ठार
खामगाव शहरातील जनुना चौफुलीवर अज्ञात वाहनाच्या धडकेने २४ वर्षीय सायकलस्वार जागीच ठार झाला. शुभम बळीराम गीते (रा. गारडगाव, ता. खामगाव) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. काल, १० जुलैच्‍या संध्याकाळी पाचच्‍या सुमारास घरून कोणालाही काही न सांगता सायकल घेऊन तो बाहेर पडला होता. मध्यरात्री १ च्‍या सुमारास खामगाव येथील तलाव रोडवर जनुना चौफुलीवर अज्ञात वाहनाने त्‍याला धडक देऊन त्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाल्याचे समोर आले. त्याचे वडील बळीराम पांडुरंग गीते (४५, रा. बाळापूर नाका गुरुदेवनगर अकोला, ह. मु. गारडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.