कडक निर्बंधांच्‍या 100% अंमलबजावणीअभावीच कोरोना गब्‍बर ‘शेर’; रस्‍त्‍यांवरची वर्दळ पुन्‍हा वाढली, 20 नंतरही निर्बंध कायम राहिले तर ‘हेच’ राहणार जबाबदार!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 10 मेपासून 20 मेपर्यंत कडक निर्बंध लागू आहेत. मात्र सुरुवातीचे एक-दोन दिवस सोडले तर आता हे निर्बंध पुन्हा कागदावरची शाई बनल्याचे चित्र आहे. गेल्या दीड महिन्यापासून निर्बंधांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा थकल्यागत चित्र असून, यातून होणाऱ्या थातूरमातूर कारवाया अनेकांना निर्बंध झुगारण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसून …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 10 मेपासून 20 मेपर्यंत कडक निर्बंध लागू आहेत. मात्र सुरुवातीचे एक-दोन दिवस सोडले तर आता हे निर्बंध पुन्‍हा कागदावरची शाई बनल्‍याचे चित्र आहे. गेल्या दीड महिन्यापासून निर्बंधांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा थकल्यागत चित्र असून, यातून होणाऱ्या थातूरमातूर कारवाया अनेकांना निर्बंध झुगारण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसून येते. रस्‍त्‍यावरची वर्दळ पुन्‍हा वाढली आहे. मूड आला की कारवाई करणाऱ्या यंत्रणेमुळे कोरोना मात्र गब्बर होत चालला असून, गेल्या सात दिवसांत त्‍याने विक्रमी कामगिरी सुरूच ठेवली आहे. कडक निर्बंधांच्‍या 100 टक्‍के अंमलबजावणीत यंत्रणा अपयशी ठरल्‍यानेच पुन्‍हा निर्बंधांची तारिख वाढेल, पण यात सामान्यांचे मरण होतेय याची जाणीव ना त्‍या रस्‍त्‍यावरील वर्दळीला आहे, ना यंत्रणेला..! कडक अंमलबजावणी करायचीच नसेल तर मग विनाकारण निर्बंध लादून सामान्यांचा छळ कशासाठी, असा प्रश्न बुलडाणा लाइव्‍हकडे अनेक नागरिक करत आहेत.

‘घरपोच’ सेवा असे मूळ आदेशात म्‍हटले असले तरी किराणा दुकाने, दूध डेअरीवर पुन्‍हा गर्दी होताना दिसत आहे. हे चित्र केवळ बुलडाणा शहरातच नाही तर जिल्ह्यातील प्रत्‍येक शहर आणि मोठ्या गावात आहे. लोकांनी कडक निर्बंध सुरुवातीचे 1-2 दिवस सोडले तर आता गांभीर्याने घेणे कमी केले आहे. रस्‍त्‍यावर फिरणाऱ्या इतक्‍या लोकांना खरंच अत्‍यावश्यक काम असेल का, असा प्रश्न पडल्‍यावाचून राहत नाही. यंत्रणेकडून नाकाबंदी आणि तपासणीत शिथिलता आल्यानेच पुन्‍हा जैसे थे चित्र झाले आहे. दुसरीकडे निर्बंधांच्‍या तारखा वाढतच आहेत. गेल्या दीड महिन्यापासून दुकाने बंद आहेत. प्रशासनाच्‍या कारवाईला घाबरणाऱ्या व्‍यावसायिकांनी दुकाने प्रामाणिकपणे बंद ठेवली आहेत. मात्र काही ‘गब्‍बर’ व्‍यापाऱ्यांची दुकाने ‘आतून’ सुरूच आहेत. मूळ किंमतीऐवजी जास्‍तीचे दर लावून त्‍यांची विक्री सुरू आहे. एकप्रकारे ग्राहकांना लुटीचा नवा ‘धंदा’ काहींनी सुरू केला आहे. त्‍यामुळे कडक निर्बंध हे त्‍या व्‍यापाऱ्यांच्‍या पथ्यावरच पडले आहेत. मात्र गरीब, प्रामाणिक व्‍यावसायिक यात भरडले जात आहेत. दीड महिन्‍यापासून दुकाने बंद असल्‍याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हप्‍ते थकले आहेत. त्‍यांच्‍याकडे काम करणाऱ्या मजुरांनाही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. पोटापुरते मालक देत असला तरी अन्य खर्चासाठी त्‍यांच्‍याकडे पैसे नाहीत. 20 मेनंतर तरी कोरोना रुग्‍ण आढळण्याचे प्रमाण घटून सर्व सुरळीत होईल, अशी आशा त्‍यांना होती. पण तीही कदाचित आता फोल ठरेल, अशी शक्‍यता आहे. त्‍यामुळे पुन्‍हा तारिख वाढली तर काय, अशी भीती त्‍यांच्‍या मनात आहे.

शेतकऱ्यांना लुटीचा नवा धंदा…

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतीकामे त्‍याला करायची आहेत. त्‍यासाठी शेतात जायचे असते. प्रत्‍येकाचे शेत गावाजवळच असेल असे नाही. त्‍यामुळे दुचाकीवर शेतकरी जात असतात. मात्र शेतकरी अत्‍यावश्यक सेवेत मोडत नसल्याने त्‍यांच्‍या दुचाकीत पेट्रोल मिळण्याची अडचण झाली आहे. आयकार्ड कुठं मिळतं, असा एक प्रश्न भाबड्या शेतकऱ्याने बुलडाणा लाइव्‍हला परवा कॉल करून केला. दुसरीकडे अनेकांनी पेट्रोल विकण्याचे खासगी धंदे सुरू केले आहेत. पंपावर पेट्रोल मिळत नसले तरी गावातील एका ‘ठराविक’ व्‍यक्‍तीकडे पेट्रोल मिळतंय, पण ते चढ्या भावाने. म्‍हणजे अगदी 120 ते 150 रुपये प्रतिलिटरने. या व्‍यक्‍तींकडे पेट्रोल कुठून येतं, असा प्रश्न आहे.

रुग्‍णांचे नातेवाइकही हवालदील

हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना वेगळ्याच आर्थिक संकटाला सामोरे जावे जात आहे. खात्‍यात पैसे आहेत, पण बँक बंद आहे. सर्वांकडे ऑनलाइन सुविधा उपलब्‍ध नसतात. त्‍यांनी काय करायचे, हा प्रश्न आहे. सध्या जिल्ह्यातील 70 ते 80 टक्‍के एटीएममध्ये ठणठणाट आहे. अनेक एटीएमचे शटरडाऊन आहे. त्‍यामुळे याला त्‍याला भिक मागण्याची वेळ रुग्‍णांच्‍या नातेवाइकांवर आली आहे.

ते नागरिकच जबाबदार…

हनुमानाच्‍या शेपटीसारख्या वाढणाऱ्या निर्बंधांच्‍या तारखा आणि त्‍यावर अंमलबजावणी करताना पोलीस यंत्रणाही थकल्याचे चित्र आहे. नागरिकांना गांभीर्य नाही, पकडले तरी अत्‍यावश्यक कारणं सांगतात. अशावेळी पोलिसांचीही माणुसकी आडवी येते. कोरोना मानगुटीवर बसलाय, कधी घोट घेईल शाश्वती नाही. कडक निर्बंधांमुळे कामे ठप्प आहेत, त्‍याची तारिख वाढली तर आपलेच नुकसान, याची जाणीव नागरिकांना नाही का, असा प्रश्न पडतो. जे काही घडतंय, कोरोना वाढतोय, निर्बंधांमुळे कामे ठप्प आहेत, जनजीवन विस्‍कळीत झालं आहे याला कडक अंमलबजावणीत अपयश आलेल्या यंत्रणेइतके बेजबाबदार नागरिकही तितकेच जबाबदार आहेत.