कडक निर्बंधांमुळे लुटारू बेफाम… तरुणाची दुचाकी अडवून ओढत मोकळ्या मैदानात नेले, बेदम मारहाण करत मोबाइल हिसकावून काढला पळ; बुलडाणा शहरातील खळबळजनक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधांमुळे सुनसान होणारे रस्ते चोर, लुटारूंसाठी मोकळे रान ठरत आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या एकट्यादुकट्याला गाठून लुटमारीच्या घटना बुलडाणा शहरात वारंवार समोर येत आहेत. काल, 4 मेच्या रात्री नऊच्या सुमारास दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाला तिघांनी पकडून ओढत मोकळ्या मैदानात नेऊन मारहाण करत लुटले. त्याचा आयफोन घेऊन तिघांनी पळ काढला. यातील एका …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधांमुळे सुनसान होणारे रस्‍ते चोर, लुटारूंसाठी मोकळे रान ठरत आहे. रस्‍त्‍यावर दिसणाऱ्या एकट्यादुकट्याला गाठून लुटमारीच्‍या घटना बुलडाणा शहरात वारंवार समोर येत आहेत. काल, 4 मेच्‍या रात्री नऊच्‍या सुमारास दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाला तिघांनी पकडून ओढत मोकळ्या मैदानात नेऊन मारहाण करत लुटले. त्‍याचा आयफोन घेऊन तिघांनी पळ काढला. यातील एका लुटारूला तरुणाने ओळखले असून, बुलडाणा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करून शोध सुरू केला आहे. वृत्त लिहिपर्यंत यातील आरोपींना अटक नव्‍हती. ही घटना सरस्वतीनगरातील महावीर शाळेजवळ घडली.

विशाल हर्षानंद डोंगरदिवे (29, रा. सरस्वतीनगर बुलडाणा) असे लुटले गेलेल्याचे नाव असून, त्‍याच्‍या तक्रारीवरून अमीत सुनिल बेंडवाल (रा. भंगीपुरा, बुलडाणा) याच्‍यासह दोन 20 ते 22 वर्षीय तरुणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. विशाल एक्सरे टेक्नीशियन असून, सरस्वतीनगरात राहतो. काल रात्री तो मोटारसायकलने सरस्वतीनगर येथील दूध डेअरीतून दूध घेऊन घराकडे येत असताना मागून लाल पल्सर मोटरसायकलवर तिघांनी येऊन अडवले. त्‍याला मोटरसायकलवरून ओढत भगवान महावीर शाळेच्या मोकळ्या जागेत नेण्याचा प्रयत्‍न केला. तेथील इलेक्‍ट्रीक पोलवर लाइट असल्याने विशालने तिघांपैकी अमितला ओळखले. तिघांनी त्‍याला लाथाबुक्‍क्यांनी मारहाण सुरू केली. एकाने त्‍याच्‍या खिशातील आय फोन 7 मोबाइल (किंमत अंदाजे 10,000 रुपये) काढून घेतला. त्‍यानंतर तिघेही पळून गेले. घरी जाऊन विशालने ही माहिती आई-वडिलांना सांगितल्यानंतर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात येत त्‍यांनी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास नापोकाँ रवींद्र हजारे करत आहेत.