कमी दरात सोन्याच्या गिन्‍न्या देण्याचे आमिष; तरुणाला दीड लाख रुपयांनी फसवले, खामगावमधील प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कमी भावात सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष दाखवून तरुणाची दीड लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. काल, ११ ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास खामगाव शहरातील विजयलक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी वैभव संजय मैद (२६, रा. घाटपुरी नाका) याने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारत गजानन …
 
कमी दरात सोन्याच्या गिन्‍न्या देण्याचे आमिष; तरुणाला दीड लाख रुपयांनी फसवले, खामगावमधील प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कमी भावात सोन्याच्या गिन्‍न्या देण्याचे आमिष दाखवून तरुणाची दीड लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. काल, ११ ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास खामगाव शहरातील विजयलक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी वैभव संजय मैद (२६, रा. घाटपुरी नाका) याने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भारत गजानन विरशीद (२५, रा. नांद्राकोळी, ता. बुलडाणा), विलास रंगनाथ पवार (रा. वर्दडा, ता. सिंदखेड राजा) व शुभम राजू चाकोते (२५, रा. सावजी ले आऊट, खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. वैभव आणि शुभम जुने मित्र आहेत. माझ्या दोन मित्रांकडे ६० ग्रॅम सोन्याच्या गिन्‍न्या आहेत. त्यांना १ लाख रुपयांत त्या विकायच्या आहेत. त्या तू घे, असे शुभमने वैभवला सांगितले. त्यानुसार शुभमने भारत व विलासला खामगाव येथे बोलावले. खामगाव येथील विजयलक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ भारत व विलासकडून वैभवने गिन्‍न्या घेतल्या. त्यांच्याजवळ १ लाख रुपये दिले. गिन्‍न्‍या घरी ठेवण्यासाठी वैभव हा भारतला घेऊन घरी गेला. त्यावेळी वैभवने त्याची मोटारसायकल शुभमजवळ दिली होती. शुभम व विलास हे पेट्रोलपंपाजवळ थांबले होते.

वैभव घरी पोहोचल्यानंतर त्याला शुभमचा फोन आला. त्याने सांगितले, की मोटारसायकल विलास घेऊन गेलाय. अजून परत आला नाही. तोपर्यंत गिन्‍न्‍या नकली असल्याची खात्री वैभवला झाली. त्याने त्याच्यासोबत घरी आलेल्या भारतला याबद्दल विचारणा केली असता आम्ही तुझा मित्र शुभमला सुद्धा गिऱ्हाईक आणल्याबद्दल २५ हजार रुपये कमिशन देणार असल्याचे भारतने सांगितले व भारत लगेच निघून गेला. त्यामुळे शुभम, भारत आणि विलासने फसवणूक केल्याचे वैभवच्या लक्षात आले. नगदी १ लाख रुपये व ४० हजार रुपयांची मोटारसायकल अशी १ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे वैभवने तक्रारीत म्हटले आहे.