कर्तव्यदक्ष एसपींचा पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना कानमंत्र… फिर्यादीच्या निरिक्षणापासून घटनास्थळावरील तपासापर्यंत कशी करायची चांगली कामगिरी!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फिर्यादीच्या निरिक्षणापासून तर बदलीपर्यंत अन् घटनास्थळावरील तपासापर्यंत… सर्व गोष्टींवर अगदी सखोल असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून चांगल्या कामगिरीचा कानमंत्र आज, 3 फेब्रुवारीला जिल्ह्यातील पोलिसांना मिळाला. निमित्त होते पोलीस दरबाराचे अन् कानमंत्र दिला तो दस्तूरखुद्द कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी.शहरातील पोलीस ठाण्यात आज दुपारी दीडला पोलीस अधीक्षक …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फिर्यादीच्या निरिक्षणापासून तर बदलीपर्यंत अन् घटनास्थळावरील तपासापर्यंत… सर्व गोष्टींवर अगदी सखोल असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून चांगल्या कामगिरीचा कानमंत्र आज, 3 फेब्रुवारीला जिल्ह्यातील पोलिसांना मिळाला. निमित्त होते पोलीस दरबाराचे अन् कानमंत्र दिला तो दस्तूरखुद्द कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी.
शहरातील पोलीस ठाण्यात आज दुपारी दीडला पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस दरबार भरवला होता. त्यावेळी अनेक विषयांवर श्री. चावरियांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की बदली कोठेही झाली तरी काम करण्याची तयारी असली पाहिजे. जिल्ह्याच्या बाहेर बदली होणार नाही. ज्या ठिकाणी पोलिसांची बदली झाली त्या ठिकाणची नवीन माणसे नवीन वातावरण बघायला मिळेल. पोलीस दलात आपण ज्यावेळी भरती झालो तो क्षण किती आनंदाचा असतो. पोलीस भरतीचा आणि भरती झालेला दिवस विसरता कामा नये. आपण आपले काम व्यवस्थित करायला पाहिजे. फिर्यादी तक्रार देण्यासाठी येतो तेव्हा आपण त्याचं निरीक्षण करायचं असतं आणि त्यांच्या सोबत बोलायचं मात्र कमी असते. फिर्यादीच्या सांगण्यावरून तक्रार घेतली गेले पाहिजे. तपास करत असताना सत्य शोधून काढणे. फिर्यादीची माहिती खरी किंवा खोटी काय हे तपास केल्यानंतरच समोर येत असते. घटनास्थळावर घटनेचा पंचनामा करत असताना ज्यांनी पूर्ण घटना बघितली असेल असे दोनच साक्षीदार घ्यावे. घटनेचा तपास हा काळजीपूर्वक केला जावा. जेणेकरून तपास हा लवकर होऊ शकतो. रोजची कामे रोज करण्याची सवय ठेवा, असा सल्लज्ञाही त्यांनी दिला.
आधी पूर्ण ऐका…
आपण लोकांचं अनेकदा पूर्ण ऐकून घेत नाही. त्यांना नेमकं सांगायचं काय हे पूर्ण समजून घेतलं पहिजे. फिर्यादीची तक्रार आपण घेत असताना आपण त्यांना मध्येच क्रॉस करतो. अगोदर पूर्ण एकूण घ्यावे आणि नंतरच त्यांना प्रश्‍न विचारावे, असेही श्री. चावरिया यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही पोलिसांनी न्यायाधीशाची भूमिका घेऊ नये. पोलिसांचा तो अधिकार नाही तो अधिकार न्यायाधीशाचा आहे, असेही ते म्हणाले.

आरोग्याची काळजी घ्या…
पोलिसांनी आरोग्याची काळजी सुद्धा घेणे महत्त्वाचे आहे. स्वतःला शिस्त लावणे फार गरजेचे आहे. पोलिसांच्या पाल्यांना शिक्षणामध्ये काही अडचण येत असेल त्यांना मदत करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
गणवेश एकसारखा असावा… इमेज जपा…
पोलिसांचा गणवेश हा शासनाने ठरवून दिलेला एकसारखा असला पाहिजे. वेगवेगळा नको. शहरात विविध उपोषणे चालू असताना पोलिसांनी अलर्ट राहावे लागते. त्या ठिकाणीसुद्धा नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही पोलिसांची असते. आपलं काम आणि आपले पोलीस खात्याची इमेज हे खराब होता कामा नये, असेही ते म्हणाले.
8 मार्चला महिला कर्मचार्‍यांचा सत्कार
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले, की कोरोनाच्या काळात महिला कर्मचार्‍यांनी चांगले काम केले. त्यांचा सन्मान 8 मार्चला जागतिक महिला दिनी केला जाणार आहे. पोलीस दलातील सर्वच कामे पोलिसांना आली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
शहरात हवीत दोन पोलीस ठाणी…
शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी प्रस्ताव मांडला की शहरात दोन पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे. ज्यामुळे कामे लवकरात लवकर होतील. हा प्रस्ताव श्री. चावरिया यांनी मान्य केला.
यावेळी श्री. साळुंखे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू, पोलीस उपनिरिक्षक विनायक रामोड, पोलीस उपनिरिक्षक जयसिंग पाटील आदींसह कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.