कलेक्‍टर साहेब तुम्‍हीच पालनहार… नियमांसह दुकाने उघडू द्या प्‍लीज…!; मोताळ्यातील व्‍यापाऱ्यांचे साकडे

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच पालनहार आहात. या कोरोनाच्या संकटात सर्व व्यापारी हवालदील झालो असून, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या सक्तीसह आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या, असे आर्जव मोताळ्यातील सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी आज, 25 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यापाऱ्यांनी म्हटले आहे, की दुकाने सुरू केल्याशिवाय आम्हाला …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्‍हाधिकारी साहेब तुम्‍हीच पालनहार आहात. या कोरोनाच्‍या संकटात सर्व व्‍यापारी हवालदील झालो असून, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. कोरोनाविषयक नियम पाळण्याच्‍या सक्‍तीसह आम्‍हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या, असे आर्जव मोताळ्यातील सर्व दुकानदार आणि व्‍यापाऱ्यांनी आज, 25 फेब्रुवारीला जिल्‍हाधिकाऱ्यांना केले.

जिल्‍हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्‍यापाऱ्यांनी म्‍हटले आहे, की दुकाने सुरू केल्याशिवाय आम्‍हाला पर्याय नाही. आमचा उदरनिर्वाह दुकानांवर अवलंबून आहे. दुकानाचे भाडे, बँकेचे हप्‍ते, घरखर्च, दवाखाना व सर्व गरजा या व्‍यवसायातूनच पूर्ण होतात. दुकानच बंद राहत असल्याने आमचे जगणे अवघड झाले आहे. उदरनिर्वाहाचे आमच्‍याकडे दुसरे कोणते साधन नाही. दुकानावर कामावर असलेल्या व्‍यक्‍तींचाही उदरनिर्वाह दुकानावरच चालतो. मार्च 2020 पासून दुकाने सतत चालूबंद अवस्‍थेत आहेत. त्‍यामुळे कर्जाचा बोझा वाढला आहे. आता परत लॉकडाऊनमुळे हा बोझा वाढणार आहे. दुकानासाठी जे काही नियम असतील ते आम्‍ही पाळू. दुकाने उघडण्याची वेळ, सुरक्षित अंतर, मास्‍क, सॅनिटायझर वापरणे हे सर्व नियम आम्‍ही पाळू. तुम्‍ही जिल्ह्याचे कर्तेधर्ते आहात. आशेचे किरण आहात. आम्‍ही विनंती करतो की नियमांसह दुकाने उघडण्याची परवानगी द्या, असे निवेदनात म्‍हटले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि व्‍यापाऱ्यांचे असे आर्जव या भावनिक संकटातून जिल्‍हाधिकारी कसे मार्ग काढतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.