काँग्रेसचे पुढचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे नसणार?

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच काँग्रेसमध्येही जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. विद्यमान अध्यक्ष दुसऱ्यांदा संधी मिळावी यासाठी आग्रही व प्रयत्नशील असतानाच अनेक इच्छुकांनी आपापल्यापरीने फिल्डिंग लावणे व लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. या पदावर ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागते की तरुणतुर्कची हा उत्सुकतेचा विषय असला तरी जिल्हा काँग्रेसचे तारणहार …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच काँग्रेसमध्येही जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. विद्यमान अध्यक्ष दुसऱ्यांदा संधी मिळावी यासाठी आग्रही व प्रयत्नशील असतानाच अनेक इच्छुकांनी आपापल्यापरीने फिल्डिंग लावणे व लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. या पदावर ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागते की तरुणतुर्कची हा उत्सुकतेचा विषय असला तरी जिल्हा काँग्रेसचे तारणहार मुकुल वासनिक यांचा ‘हात’ कोणाच्या पाठीशी यावर जिल्हाध्यक्षपदाचा फैसला होणार, हे अंतिम सत्य आहे.
माजी आमदार राहुल बोंद्रे यांची अध्यक्षपदाची कारकीर्द आता जवळपास संपल्याचे काँग्रेस गोटात मानले जात आहे. याला मागील राजकीय पार्श्वभूमी व सध्याचे बदलते राजकारण कारणीभूत मानले जात आहे. त्यांची 2019 च्या विधानसभेपूर्वी भाजपामध्ये जाण्याची चर्चा, त्यावरून काँग्रेसमध्ये उठलेले वादळ, बोंद्रे यांनी त्यावरून दीर्घकाळ बाळगलेले साळसूद मौन, यामुळे निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी यांची झालेली घालमेल, काँग्रेसचे झालेले नुकसान व परिणामी पक्षाचा गड असलेल्या चिखलीत स्वतः बोंद्रे व बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांचे नवख्यांच्या हातून झालेले दारुण पराभव हा इतिहास बदलाच्या निमित्ताने पुन्हा सामोरे येत ( आणला जात? ) आहे. त्यावेळी पक्षाची आब्रू वाचविण्यासाठी व डॅमेज कंट्रोलसाठी दस्तूरखुद्द द ग्रेट वासनिकांना दिल्लीवरून चिखलीपर्यंत यावे लागले होते. एवढेच नव्हे तर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते, ही घडामोड मुकुल वासनिक व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेली व अजूनही न भरलेली जखम ठरली आहे.

यामुळे जिल्हा अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अर्थात भावी राजकारण डोक्यात ठेवून राहुल बोंद्रे मुदतवाढीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांना राहुल ब्रिगेडचे हर्षवर्धन सपकाळ यांचे पाठबळ आहे. प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निष्ठावान संजय राठोड यांची वर्णी लागल्यावर बदलाच्या वाऱ्याची गती वाढल्याचे चित्र आहे. सध्याच्या या घडामोडीचा मुख्य केंद्रबिंदू जिल्ह्याचे राजकारण ठरविणारे बुलडाणा शहर ठरले आहे. यामुळे राठोड गटासह विविध इच्छुकांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावत लॉबिंग करणे सुरू केले आहे. यामुळे जुन्या फळीतील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, माजी जिल्‍हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रसेनजीत पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. राजकीय आयुष्याच्या संध्याकाळी कमळ हाती घेतलेले पण अध्यक्षपदाशिवाय काहीच न मिळालेले आणि काँग्रेसमध्येच सर्वकाही मिळालेले ज्येष्ठ नेते घर वापसीच्या मनस्थितीत आहेत. त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय मध्यम फळीतील स्वाती वाकेकर, दीपक रिंढे, कासम गवळी अशी नावे चर्चेत आहे. सध्या उपेक्षित व विधी क्षेत्रात रमलेल्या निष्ठावान नेत्याचेही नाव या यादीत आहे, अंतिम फैसला वासनिक करणार हे उघड रहस्य असून, धक्कातंत्रमध्ये वाकबदार ‘बॉस’ कुणाल धक्का देतात आणि कुणाला संधी देतात हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.

बहुजन चेहऱ्याला संधीची चिन्हे…
दरम्यान अनेक दशके जिल्ह्यात राज्य करणाऱ्या व आता अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा इतिहास मोठा रंजक आहे. स्वर्गीय गोविंद सेठ भाटिया यांनी तब्बल अडीच दशके जिल्हा काँग्रेस ताब्यात ठेवली. यानंतर सुबोध सावजी, जनार्दन बोन्द्रे, गणेश पाटील, श्याम उमाळकर, विजय अंभोरे अन्‌ राहुल बोंद्रे यांनी नेतृत्व केले. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने असलेल्या मराठा कुणबी समाजाला ही संधी मिळालेली नाहीये! यंदा राजकीय बरोबरच नवीन सामाजिक इतिहासही घडेल काय ? हा देखील व्यापक उत्सुकतेचा विषय ठरला आहे.