किन्होळ्याच्‍या कोविड सेंटरमध्ये गुंजले अध्यात्माचे सूर!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना केअर सेंटर म्हणजे गंभीर, निराशामय वातावरण, त्रस्त रुग्ण अन् त्यांचे नातेवाईक असा माहौल असतो… मात्र लोक सहभागातून चिखली तालुक्यातील किन्होळ्यात साकारलेल्या जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील पहिल्या कोविड सेंटरला हे मान्य नाय! यामुळे तेथील वातावरण नेहमी प्रसन्न, आनंददायी व टेन्शन फ्री असण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना केअर सेंटर म्हणजे गंभीर, निराशामय वातावरण, त्रस्‍त रुग्ण अन्‌ त्यांचे नातेवाईक असा माहौल असतो… मात्र लोक सहभागातून चिखली तालुक्यातील किन्होळ्यात साकारलेल्या जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील पहिल्या कोविड सेंटरला हे मान्य नाय! यामुळे तेथील वातावरण नेहमी प्रसन्न, आनंददायी व टेन्शन फ्री असण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व गावकऱ्यांचा भर असतो.

यासाठी विविध उपक्रमांसोबतच म्युझिक थेरपी तर कधी अध्यात्माचादेखील प्रयोग करण्यात येतो. मध्यंतरी केंद्रात संगीत रजनीच्‍या स्वरांनी रुग्णांना रिझविले व कोरोनाशी लढण्याचे मनोबल दिले. काल 24 मेच्या रात्री केंद्रात मृदंग, टाळ, हार्मोनियमच्या तालावर कीर्तनाचे सूर निनादले! हभप पुरुषोत्तम महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आत्मबल वाढवत मनोबलाचे ‘डोस’ दिले. यामुळे कोरोनाशी दोनहात करणाऱ्या रुग्णांचे चेहरे खुलल्याचे सुखद चित्र दिसून आले.

गावकऱ्यांनी आपल्या घरात बसून कीर्तनाचा आस्वाद घेतला. महाराजांनी किन्होळा पॅटर्नचे कौतुक केल्याने प्रभुकाका बाहेकर व त्यांच्या चमुचा उत्साह दुणावला. यावेळी बोलताना केंद्राचे शिल्पकार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. सध्या या कोविड केअर सेंटरमध्ये 12 रुग्ण भरती असून, 8 रुग्णांना सुटी मिळाली आहे तर 10 जणांना बुलडाणा येथे रेफर करण्यात आले आहे. तसेच या सेंटरमधील रुग्णांच्या सेवेमध्ये 50 स्वयंसेवकांची टीम कार्यरत असल्याचे ते म्हणाले.