कृषि विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलाय ‘हा’ महत्त्वाचा सल्ला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन हे स्वपरागसिंतीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत शेतकयांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सोयाबीन हे स्वपरागसिंतीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत शेतकयांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरू शकतात. गावनिहाय बियाणे उपलब्धता जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळाला भेट द्यावी.

सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्‍टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना सोयाबीनची सातपेक्षा जास्त थर बियाण्याची पोती एकमेकावर ठेवू नये. बियाणे उन्हात ठेवू नये.  बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी. शेतकऱ्यांनी 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीन निवड करताना बाजारातून आणायचे असल्यास कोरडवाहू शेतीसाठी एम ए यू एस 71, एम ए यू एस 158, फुले कल्याणी, जे.एस 95, जे. एस 9305 या वाणांची निवड करावी.

पेरणीच्या एक पूर्ण दिवसापूर्वी कार्बोकजिम 37.5 टक्के अधिक थायरम 37.5 टक्के ग्रॅम / किलो बियाण्यास लावावे. पेरणीच्या दोन तासांपूर्वी 20 ग्रॅम रायझोबियम किंवा 6 मि.ली पी.एस.बी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मि. लि./किलो बियाण्यास लावावे. यापैकी जी पद्धत उपलब्ध असेल त्याचा बीजप्रक्रिया करण्यासाठी वापर करावा.  बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकाची पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा. ते शक्य नसल्यास प्रत्येक 4 ते 6 ओळी मागे 1 ओळ सोडावी म्हणजेच पट्टा पद्धतीने पेरणी करावी. बियाणे 3 ते 5 से मी पर्यंत खोल पडल्याची खात्री करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. नंतर त्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

बियाण्याची उगवण क्षमतेनुसार एकरी बियाण्याचा वापर

उगवण क्षमता 70 टक्के बियाणे एकरी 30 किलो, उगवण क्षमता 69 टक्के बियाणे एकरी 30.50 किलो,  उगवण क्षमता 68 टक्के बियाणे एकरी 31 किलो, उगवण क्षमता 67 टक्के बियाणे एकरी 31.50 किलो, उगवण क्षमता 66 टक्के बियाणे एकरी 32 किलो, उगवण क्षमता 60 टक्के बियाणे एकरी 35 किलो.