केवळ पैसे परत करा एवढ्याने दहशत बसेल का?; लद्धड, मेहेत्रे, सोळंकी, आशीर्वाद, खरात, ऑक्सिजन, मातोश्रीसारख्या रुग्‍णालयांवर जास्‍तीचे बिल वसुलीचा ठपका अनेक प्रश्न निर्माण करणारा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लेखा परीक्षकांनी रोखठोकपणे कोरोना रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळलेल्या 7 खासगी कोविड सेंटर्सना दणका दिला आहे. मात्र, त्यांच्यावर केवळ पैसे परत करा, एवढीच कारवाई करण्यात आली आहे. असे जास्तीचे बिल घेऊन एकप्रकारे रुग्णांची लूट केल्या प्रकरणी गुन्हा का दाखल केला जात नाही, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. ऐन संकटात माणुसकी सोडणाऱ्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लेखा परीक्षकांनी रोखठोकपणे कोरोना रुग्‍णांकडून जास्‍तीचे पैसे उकळलेल्या 7 खासगी कोविड सेंटर्सना दणका दिला आहे. मात्र, त्‍यांच्‍यावर केवळ पैसे परत करा, एवढीच कारवाई करण्यात आली आहे. असे जास्‍तीचे बिल घेऊन एकप्रकारे रुग्‍णांची लूट केल्या प्रकरणी गुन्‍हा का दाखल केला जात नाही, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. ऐन संकटात माणुसकी सोडणाऱ्या या रुग्‍णालयांकडून अंगिकारलेल्या रुग्‍णसेवेच्या व्रताचाही भंग झाला आहे. त्‍यामुळे आयएमएसारख्या संघटनेकडून त्‍यांच्‍यावर कारवाई होणार का, की पाठराखण केली जाणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

बुलडाण्यातील लद्धड, सोळंकी, मेहेत्रे, आशीर्वाद, खरात यांच्‍यासह मलकापुरातील ऑक्सिजन, मेहकरमधील मातोश्री या रुग्‍णालयांवर जास्‍तीचे बिल घेतल्याचा ठपका लेखापरिक्षकांनी ठेवला आहे. ही रक्‍कम तब्‍बल 5 लाख रुपयांच्‍या घरात जाते. ही बाब समोर येताच जिल्हाधिकाऱ्यांनी ज्‍या रुग्‍णालयांनी जास्‍तीची रक्‍कम घेतली आहे, त्‍यांनी ही रक्‍कम परत करावी, असे आदेश दिले आहेत. तशा सूचनादेखील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र या प्रकारामुळे एकूणच वैद्यकीय क्षेत्रातील लुटमार पुन्‍हा एकदा समोर आली आहे. त्‍यामुळे केवळ पैसे परत करा एवढीच कारवाई होणार असेल तर यामुळे भविष्यातील लूट थांबेलच याची शाश्वती नाही. यातील दोन रुग्‍णालयांत रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक केलेले दोन कर्मचारी कार्यरत होते. त्‍यामुळे आणखीनच संशय निर्माण झाला आहे. आयएमए संघटना अशा रुग्‍णालयांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, हाही प्रश्नच आहे.

नव्या आदेशात राज्‍य सरकारने रुग्‍णांची लूटमार करणाऱ्या खासगी कोविड सेंटरच्‍या रुग्‍णालयाचीच परवानगी रद्द करण्याचा आणि गुन्‍हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पण यापूर्वी झालेल्या लुटीचे काय, असा सवाल रुग्‍ण करत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुद्धही गुन्‍हे दाखल करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याशिवाय या रुग्‍णालयांच्‍या एकूण कोरोना काळातील व्यवहारांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.