कोरोनाने रक्‍ताच्‍या नात्‍याला हरवलं… आईच्‍या अंत्‍यसंस्‍कारालाही तिला नाही जाता आले… हुंदके थांबेना, अश्रू थांबेना… पैशांची तजवीजही नाही आली कामी!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने नातीगोती शून्य केली आहेत. काहींना याच कोरोनाने स्वार्थी केलेय, तर काहींना हतबल… शेगावच्या धनगरनगरात राहणाऱ्या एका महिलेच्या आईचे सोलापूर जिल्ह्यातील वाटोंब्रा गावी निधन झाले. तिला ही वार्ता देण्यात आली. तिने तातडीने पैशांची तजवीज केली अन् जाण्यासाठी वाहने शोधू लागली… पण जिल्हाबंदी असल्याने वाहन मिळेना. तिने ई-पाससाठी …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने नातीगोती शून्‍य केली आहेत. काहींना याच कोरोनाने स्‍वार्थी केलेय, तर काहींना हतबल… शेगावच्‍या धनगरनगरात राहणाऱ्या एका महिलेच्‍या आईचे सोलापूर जिल्ह्यातील वाटोंब्रा गावी निधन झाले. तिला ही वार्ता देण्यात आली. तिने तातडीने पैशांची तजवीज केली अन्‌ जाण्यासाठी वाहने शोधू लागली… पण जिल्हाबंदी असल्याने वाहन मिळेना. तिने ई-पाससाठी प्रयत्‍न केले, पण तोही मिळाला नाही. त्‍यामुळे हुंदके थांबत नसले अन्‌ अश्रूधारा वाहत असल्या तरी आईला तिला शेवटचेही पाहता आले नाही…

विमलबाई कैलास पारशे असे या महिलेचे नाव असून, ती अंदाजे 35 वर्षांपासून शेगाव येथे मोलमजुरीचे काम करते.  9 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील वाटोंब्रा येथे राहणारी त्यांची आई गोदाबाई दामोदर गजबे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरातील महिलांनी त्यांना धीर देत सावरण्याचा प्रयत्‍न केला. आईच्‍या अंत्यसंस्कारासाठी जाता यावे म्‍हणून विमलबाईंच्‍या हालचाली सुरू झाल्या. स्वतः कडे पैसे नसतानाही उधार उसनवार करून सहा हजार रुपये गोळा केले. एका सामाजिक कार्यकर्त्याला विनंती केली. ‘साहेब मला कसेही करून आईच्या गावापर्यंत पोहोचवा…’ परंतु जिल्हा बंदी असल्‍याने या महिलेला सोलापूर जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. आई वारल्याचे दुःख किती मोठे असते, हे प्रत्‍येकाला कळते, पण तिची मदत करण्यास सारेच हतबल झाले आहेत. सर्वात मोठी मुलगी असलेल्या विमलबाईंना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांच्‍या वडिलांची तब्येतही नाजूक असल्याने त्यांचेही काही बरेवाईट होईल या भीतीने त्या ओक्साबोक्‍सी रडत आहेत.

माणुसकीच्‍या नात्‍याने या घटनेकडे बघण्याची गरज…

आईच्‍या अंत्‍यसंस्‍काराला न जाऊ शकलेली ही महिला या धक्‍क्‍यातून सावरलेली नाही. पण अशा घटनांत प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. रक्‍ताच्‍या नात्‍यातील कुणाच्‍या निधनानंतर त्‍या व्‍यक्‍तीला त्‍या स्‍थळापर्यंत जाता येईल यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.