कोरोनाबाधितांना सक्‍तीने रुग्‍णालयात दाखल करणार!; लसीकरणाच्‍या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी धडक कार्यक्रम!!; पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी घेतली कोरोनाविषयक आढावा बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आरोग्य संस्था व तज्ज्ञांनी संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. उद्दिष्टाच्या अनुषंगाने ६० ते ७० टक्के लसीकरण झाले पाहिजे. यंत्रणांनी कालबद्ध व धडक कार्यक्रम ठरवून पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशी सूचना पालकमंत्री …
 
कोरोनाबाधितांना सक्‍तीने रुग्‍णालयात दाखल करणार!; लसीकरणाच्‍या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी धडक कार्यक्रम!!; पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी घेतली कोरोनाविषयक आढावा बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आरोग्य संस्था व तज्‍ज्ञांनी संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. उद्दिष्टाच्या अनुषंगाने ६० ते ७० टक्के लसीकरण झाले पाहिजे. यंत्रणांनी कालबद्ध व धडक कार्यक्रम ठरवून पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, ६ सप्‍टेंबरला केली.

कोरोना संसर्ग नियंत्रण आढावा बैठक पालकमंत्र्यांच्‍या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सहायक आयुक्त श्री. बर्डे आदी उपस्थित होते.

सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरण न देण्याच्या सूचना करत पालकमंत्री म्हणाले, की कोरोनाबाधित रुग्णांना घरी ठेवू नका. त्यांच्यामुळे आणखी संसर्ग वाढतो. त्यांना सक्तीने रुग्णालयात ठेवावे. शासकीय रुग्णालयांतील सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा. जेणेकरून रुग्ण उपचार घेतील. तसेच ज्या तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून एकही रुग्ण निघत नाही. तिथे तपासण्या वाढवाव्यात. त्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा. मागील लाटेमध्ये मान्यता दिलेल्या खासगी कोविड रुग्णालयांची मान्यता पुन्हा तपासून घ्यावी. त्यासाठी त्‍या रुग्णालयांमधील सुविधांचा आढावा घ्यावा व पुढे मान्यतांचे नुतनीकरण करावे, असेही ते म्‍हणाले.

कोरोना काळात सर्वात महत्त्वाचा घटक हा प्राणवायू पुरवठा ठरतो. मागील लाटेवेळी १७ मेट्रिक टन उच्चांकी मागणी होती. भविष्यात लाट आल्यास दुप्पट मागणी गृहीत धरून आतापासून नियोजन करून ठेवावे. कार्यान्वित होणाऱ्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची कामे पूर्ण करावे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात असलेले डायलिसीस युनीट जुने झाली आहेत. अनेक ठिकाणी मनुष्यबळाअभावी किंवा तांत्रिक अडचणीमुळे युनीट बंद आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले डायलिसीस युनीट खरेदी करावे. त्यापूर्वी जुन्या युनीटची तपासणी करून सद्यःस्थिती तपासून घ्यावी. महसूल, ग्रामविकास व गृह विभागाने आपल्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावून घ्यावेत. त्याचे नियंत्रण जिल्हास्तरावर ठेवावे. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांवर जरब बसून नागरिकांची कामे गतीने होतील, असेही पालकमंत्र्यांनी सूचित केले.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची बांधकामे झाली आहेत. अशा ठिकाणी तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. जिल्हा रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. इमारतीला अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. ही इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावा. जिल्ह्यात शहरी भागातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट झालेले नाही. त्याचाही प्रस्ताव पाठवून ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सणासुदीचे दिवस लक्षात घेता मिठाई व मिष्ठान्नात भेसळ तपासणीसाठी मोहीम सुरू करावी. अन्न पदार्थांवर बेस्ट बिफोरची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करावी. होत नसल्यास कारवाया वाढविण्यात याव्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.