कोरोना निर्मूलन की कोरोना बढाव?.. शेगावमध्ये तपासणीसाठी उसळली व्‍यावसायिकांची गर्दी… सुरक्षित अंतर नसल्याने धोका वाढला!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 17 मार्चपर्यंत व्यापारी, व्यावसायिकांना कोरोना तपासणी करून घेण्यास अनिवार्य करून, तशी तपासणी केली नाही तर 5 हजार रुपये दंड आणि दुकानाला सील लावण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने शहरभर भोंगा फिरवून दिला. त्यानंतर तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील टाऊन हॉलमध्ये व्यापारी-व्यावसायिकांची एकच गर्दी उसळली आहे. या गर्दीत अर्थातच सुरक्षित …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 17 मार्चपर्यंत व्‍यापारी, व्‍यावसायिकांना कोरोना तपासणी करून घेण्यास अनिवार्य करून, तशी तपासणी केली नाही तर 5 हजार रुपये दंड आणि दुकानाला सील लावण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने शहरभर भोंगा फिरवून दिला. त्‍यानंतर तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील टाऊन हॉलमध्ये व्‍यापारी-व्यावसायिकांची एकच गर्दी उसळली आहे. या गर्दीत अर्थातच सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रश्नच नव्‍हता. त्‍यामुळे एखादा कोरोनाबाधित व्‍यापारी किती जणांना बाधित करू शकतो, याचा साधा विचारही या ठिकाणी करण्यात आल्याचे दिसून आले नाही.

शेगाव शहर आणि तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांनी उपाययोजनांवर भर दिला असून, त्‍यातूनच व्‍यापारी आणि छोट्या मोठ्या व्‍यावसायिकांचीही कोरोना तपासणी केली जात आहे. यासाठी शेगावमध्ये शिबिर घेण्यात आले. काल, 16 मार्चला 390 व्‍यावसायिकांची तपासणी झाली. पैकी 16 व्‍यावसायिक पॉझिटिव्‍ह आढळल्‍याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्‍हणजे, हे 16 बाधित व्‍यावसायिक गर्दीत स्‍वॅब देण्यासाठी थांबलेले असल्याने अन्य किती व्‍यावसायिकांना त्‍यांच्‍यामुळे कोरोना झाला असेल किंवा होऊ शकतो, याची साधी कल्‍पनाही नगरपालिका प्रशासनाने केलेली नाही. 5 हजार रुपये दंड आणि दुकान सील होण्याच्‍या भीतीपोटी व्‍यापारी, व्‍यावसायिक गर्दी करत आहेत. पण सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याने कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी आणखीनच वाढल्‍याचे या ठिकाणी दिसून आले. प्रशासनाने कोरोना तपासणीसाठी फारसे नियोजन न केल्याचा हा परिणाम दिसत असून, तारखांनुसार व्‍यापाऱ्यांना बोलावून तपासण्या केल्या असल्या तर गर्दी झाली नसती, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी व्‍यावसायिकांनी दिल्या. दोन दिवसांत शेगाव शहरातील 8-10 हजार व्‍यावसायिकांच्‍या तपासण्या होणार कशा, असा प्रश्न प्रशासनालाही पडला नाही, हे विशेष.

शेगाव तहसीलदारांना याबाबत व्यापारी संघटनेने निवेदन दिले आहे. निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही होऊन प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा दंड हा व्यापाऱ्यांना ठोठावू नये. काल आणि आज झालेल्या गोंधळाचा व नगरपालिका प्रशासनाच्या शून्य नियोजनाचा आम्ही निषेध करतो.

शेखर नागपाल, व्यापारी महासंघ संस्थापक अध्यक्ष