क्रिकेटच्या पीचवर राजकारणाची सेटिंग!; तिन्ही पक्षांचे नेते मैदानावर आले एकत्र!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रिकेटची क्रेझ अगदी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आहे. खेळण्यात अन् खेळविण्यात माहीर असलेल्या राजकारण्यांच्या नजरेतून हा खेळ सुटला असता तर आश्चर्य. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी आणि यानिमित्ताने प्रसिद्धी झोतात येण्यासाठी राजकीय मंडळी क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करतात. साधारणतः मकरसंक्रांतीनंतर सुरू होणारा सिलसिला पार मेपर्यंत चालत राहतो. हजार-पाचशेपासून लाखो रुपयांच्या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रिकेटची क्रेझ अगदी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आहे. खेळण्यात अन् खेळविण्यात माहीर असलेल्या राजकारण्यांच्या नजरेतून हा खेळ सुटला असता तर आश्‍चर्य. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी आणि यानिमित्ताने प्रसिद्धी झोतात येण्यासाठी राजकीय मंडळी क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करतात. साधारणतः मकरसंक्रांतीनंतर सुरू होणारा सिलसिला पार मेपर्यंत चालत राहतो. हजार-पाचशेपासून लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करणार्‍या या खेळात यंदा राजकारणी मंडळी हिरीरीनेही सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यानंतर आता आमदार संजय गायकवाड क्रिकेटच्या पीचवर उतरले असून, याला निमित्त आहे, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे!


शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिजामाता प्रेक्षागार मैदानावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. 1 लक्ष 11 हजार रुपयांचे पारितोषिक असणारी ही स्पर्धा संपत नाही तोच आमदार संजय गायकवाड यांनी त्याहीपेक्षा मोठी बक्षिसाची रक्कम ठेवत मोठी स्पर्धा ठेवली आहे. 5 लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक असणार्‍या या स्पर्धेच्या मॅन ऑफ दी सिरीजसाठी बुलेट गाडीचे सुद्धा बक्षीस आहे. आज, 23 जानेवारीला भव्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर, पालकमंत्री डॉ. शिंगणे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार राहुल बोंद्रे उपस्थित होते. क्रिकेटच्या माध्यमातून का होईना महाविकास आघाडीचे तिन्ही महत्त्वाचे नेते यावेळी एकत्र दिसले. क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता असते तसंच राजकारणातही सांघिक प्रयत्नांमुळेच सध्या महाविकास आघाडी सत्तेत आहे, हेच जणू या तिन्ही नेत्यांनी दाखवून दिले. जिल्ह्यातले अनेक नेते अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करताना दिसतात. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना कुस्ती, कबड्डी, बॉडीबिल्डिंग अशा क्रीडाप्रकारात रुची असली तरी क्रिकेटच्या मैदानातही ते कसलेल्या फलंदाजाप्रमाणे बॅटिंग करतात. राजकारणातही ते एखाद्या आक्रमक फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करतात. त्यांनी टाकलेल्या गुगलीवर बुलडाण्यातले स्वयंघोषित लोकनेतेही क्लीनबोल्ड झाल्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसले आहे.
दुसरीकडे चिखलीतही आमदार श्‍वेताताई महाले या क्रिकेटच्या चांगल्याच रसिक आहेत. 2014 मध्ये चिखलीमध्ये एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत त्यांनी राजकारणाच्या खेळपट्टीवर दमदार एंट्री केली होती. तेव्हापासून दरवर्षी त्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत असतात. युवा वर्गाला पक्षाशी जोडण्यासाठी हा फंडा आता जिल्ह्यातले बरेच राजकारणी वापरत आहेत. अन्य खेळांच्या तुलनेत क्रिकेटची लोकप्रियता, युवा वर्ग आणि सामने बघायला येणारे प्रेक्षक, ज्या नेत्याने बक्षीस दिले त्यांचे मोठमोठे बॅनर, पक्षाचे झेंडे यामुळे क्रिकेटच्या मैदानालाही राजकीय सभेचा रंग प्राप्त होतो. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या पीचवर सेट होण्याचा हा प्रयत्न बराच यशस्वी होताना दिसत आहे.