खळबळजनक… मलकापुरात उपनगराध्यक्षाच्या बर्थ डे पार्टीत नंग्या तलवारी नाचल्या!; काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची हजेरी

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे उपनगराध्यक्ष, काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमदार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत नंग्या तलवारी घेऊन कार्यकर्ते नाचल्याचा धक्कादायक प्रकार काल, 10 फेब्रुवारीला रात्री घडला. शहरातील पारपेठ येथील नगरपालिकेच्या शाळेतच हा धिंगाणा सुरू होता. या घटनेचा व्हिडिओ रात्रीपासून व्हायरल झाल्याने मलकापूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने दोन …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे उपनगराध्यक्ष, काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमदार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत नंग्या तलवारी घेऊन कार्यकर्ते नाचल्याचा धक्कादायक प्रकार काल, 10 फेब्रुवारीला रात्री घडला. शहरातील पारपेठ येथील नगरपालिकेच्या शाळेतच हा धिंगाणा सुरू होता. या घटनेचा व्हिडिओ रात्रीपासून व्हायरल झाल्याने मलकापूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, जेवणावळी पूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षापासून अनेक पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.


सूत्रांच्या माहितीनुसार, हाजी रशिदखाँ जमदार यांचा काल 71 वा वाढदिवस होता. यानिमित्त पारपेठच्या पालिका शाळेत काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीने सायंकाळी 5 ला कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला काँग्रेसचे मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह अन्य महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. मेळाव्यानंतर जंगी पार्टी सुरू झाली. पार्टीत काही उत्साही कार्यकर्त्यांनी जमदार यांना माल्यार्पण केल्यानंतर तलवारी नाचवायला सुरुवात केली. हे क्षण अनेकांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेर्‍यात कैद केले आणि रात्रीपासून व्हायरल व्हायला सुरुवात झाली. पोलिसांनी तातडीने या प्रकाराची दखल घेत व्हिडिओत दिसणार्‍या युवकांची ओळख पटवणे सुरू केले. पैकी दोघांची ओळख पटली.

मोहम्मद शोएब मोहम्मद जहीर आणि जावेद खान इस्माईल खान (दोघेही रा. पारपेठ, मलकापूर) यांना रात्रीतूनच पोलिसांनी अटक केली आहे. झडती घेऊन त्यांच्या घरातून 5 तलवारी जप्त केल्याचे मलकापूर शहर ठाण्याचे ठाणेदार श्री. काटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जमदार यांच्यासह अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारीही गोत्यात आले आहेत.

या प्रकरणात आणखी तिघांना आज सकाळी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांची नावे कळू शकली नाहीत. त्यामुळे ताब्यात घेतलेल्यांची एकूण संख्या आता 5 झाली आहे.