Update : वीज तंत्रज्ञाने ग्रा.पं. कर्मचाऱ्याला वीज खांबावर चढवले, अचानक वीज सुरू होऊन जागीच कर्मचारी चिटकला!; मलकापूर पांग्रातील धक्‍कादायक घटना

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुख्य वीज वाहिनीच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज सुरू झाल्याने शॉक लागून ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथे आज, 16 मार्चला सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी त्याच्यासोबत वीज तंत्रज्ञ प्रशांत देशमुखही होता, पण तो घटनेनंतर फरारी झाला. घटनेची …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : मुख्य वीज वाहिनीच्‍या खांबावर चढून दुरुस्‍तीचे काम करताना अचानक वीज सुरू झाल्याने शॉक लागून ग्रामपंचायत शिपायाचा मृत्‍यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथे आज, 16 मार्चला सकाळी दहाच्‍या सुमारास घडली. यावेळी त्‍याच्‍यासोबत वीज तंत्रज्ञ प्रशांत देशमुखही होता, पण तो घटनेनंतर फरारी झाला. घटनेची माहिती गावात कळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्‍थळी जमले. त्‍यांनी जोपर्यंत कर्मचाऱ्याच्‍या नातेवाइकांना महावितरणकडून अर्थसाह्य मिळत नाही आणि वीज तंत्रज्ञाविरोधात गुन्‍हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर साखरखेर्डा पोलिसांनी वीज तंत्रज्ञाविरोधात गुन्‍हा दाखल करत त्‍याला बिबी येथून अटक केली आहे.

विश्वंभर श्रावण मांजरे (40, रा. मलकापूर पांग्रा) असे मृत्‍यू झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍याचे नाव आहे. मलकापूर पांग्रा- साखरखेर्डा रस्‍त्‍यावरील रविराज धाब्यासमोरील वीज खांबावर दुरुस्‍तीचे काम सुरू होते. विशेष म्‍हणजे हे दुरुस्‍तीचे काम महावितरणच्‍या कर्मचाऱ्यानेच करणे अपेक्षित होते. मात्र देशमुख याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला खांबावर चढवले. यासाठी या कर्मचाऱ्याला तो गावातून घेऊन गेला. अचानक वीज पुरवठा सुरू झाल्‍याने मांजरे जागीच चिटकला. गावकऱ्यांनी माहिती मिळताच तातडीने तिकडे धाव घेतली. मोठी गर्दी जमली होती. साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि सहकाऱ्यांनीही घटनास्‍थळी धाव घेतली. मात्र मृतदेह खाली उतरवण्यास ग्रामस्‍थांनी विरोध सुरू केला. आधी महावितरणकडून मदत जाहीर करा आणि तंत्रज्ञ देशमुख व हेल्पर सोनपसारे यास तातडीने अटक करावी, अशी भूमिका ग्रामस्‍थांनी घेतली. मोठी गर्दी जमल्याने पोलीसही हतबल झाले. या प्रकरणात नंदकिशोर श्रावण मांजरे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्‍हटले आहे, की मलकापूर पांग्रा येथील कृषीपंपाचा वीजपुरवठा रात्रीपासून खंडित होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत अशोक देशमुख याने माझा भाऊ ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर श्रावन मांजरे यांना अकिल ठेकेदार यांच्‍या शेतातील खांबावर जंमअर जोडण्यासाठी पाठवले. तेवढ्यात विज पुरवठा सुरू होताच विश्वंभर खांबावरच ठार झाला. घटनास्थळी ठाणेदार जितेंद्र आडोळे, दुय्यम ठाणेदार दीपक राणे, जमादार नारायण गीते, बिबीचे ठाणेदार एल. डी. तावरे यांनी संतप्त नागरिकांची समजून घालत वातावरण शांत केले. तपास दुय्यम ठाणेदार दीपक राणे करत आहेत.

देशमुख म्हणतो, मी तिथे नव्‍हतोच…
विश्वंभर मांजरे त्या भागातील विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्‍या आग्रहास्तव खांबावर काम करण्यास गेले होते. घटनास्थळी मी हजर नव्हतो. मला फोनवर लोडशेडिंगबद्दल विचारणा करण्यात आली होती. या ठिकाणी लोडशेडिंग होते मात्र क्रॉसिंग झाल्याने ही घटना घडली, असा जबाब वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत देशमुख याने पोलिसांत दिला आहे.

मनमिळाऊ स्‍वभावाचा, सर्वांना पाजायचा पाणी…

ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर मांजरे हा मनमिळाऊ स्‍वभावाचा होता. रोज पाणी सोडण्याचे काम तो इमानइतबारे करायचा. ग्रामस्‍थांशी त्‍याचे सलोख्याने संबंध होते. रोज अवघ्या गावाला पाणी पाजणाऱ्या विश्वंभरला मरणावेळी कुणी पाणी पाजू शकले नाही, अशी खंत ग्रामस्‍थ व्‍यक्‍त करत होते.