खामगावमध्ये आगीचे तांडव! आठवडे बाजारातील 12 गोदामे खाक!!; घातपाताचा संशय

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहराच्या आठवडे बाजारातील भाजीपाल्याच्या गोदामांना आज, 10 एप्रिलला रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. यात 12 गोदामे लागोपाठ आगीच्या वेढ्यात सापडून खाक झाली. आग काही क्षणांतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. मध्यवस्तीत हा आठवडी बाजार आहे. या बाजारात भाजीपाल्याची हर्राशी होते. त्यामुळे काही व्यावसायिकांनी येथेच …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहराच्‍या आठवडे बाजारातील भाजीपाल्याच्‍या गोदामांना आज, 10 एप्रिलला रात्री पावणेआठच्‍या सुमारास भीषण आग लागली. यात 12 गोदामे लागोपाठ आगीच्‍या वेढ्यात सापडून खाक झाली. आग काही क्षणांतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरल्याने घातपाताचा संशय व्‍यक्‍त होत आहे.

मध्यवस्तीत हा आठवडी बाजार आहे. या बाजारात भाजीपाल्याची हर्राशी होते. त्यामुळे काही व्यावसायिकांनी येथेच सुका आणि ओल्‍या भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी गोदामे उभारली आहेत. यातील एका दुकानाला रात्री 7:45 वाजता दरम्यान आग लागली. त्यानंतर एकापाठोपाठ 12 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन विभागाचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री साडेआठवाजेपर्यंत अग्नीशमन विभागाने पाण्याचे तीन बंब रिचविले होते. रात्री उशीरापर्यंत आग विझविणे सुरू होते. आग इतकी मोठी होती की परिसरातील नागरिक भयग्रस्‍त झाले होते.  आगीत संतोष राजाराम क्षीरसागर, विनोद दशरथ क्षीरसागर, गजानन शंकरराव डाहे, बोदडे ट्रेडर्स, सागर मिरची भांडार, राखोंडे ट्रेडर्स, सादिक बागवान ट्रेडर्स, बळीराम निमकर्डे, नशीब फ्रूट, गोलू ट्रेडर्स, शोहरत खान यांच्या दुकानासह मोतीराम बाबा ट्रेडर्स आदींचे गोदामे खाक झाली आहेत. गोदामांना लागलेल्या आगीने क्षर्णाधात रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट दूरपर्यंत पसरले. आगीच्या ज्वाळासोबतच प्रचंड धूराचे लोटही परिसरात पसरले होते. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

घातपाताचा संशय

कुणीतरी कचरा पेटवल्‍याने दुकानांना आग लागल्याची चर्चा घटनास्‍थळी होत असतानाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात इतक्‍या कमी वेळात आग पसरल्‍याने घातपाताचा संशयही व्‍यक्‍त होत आहे.