“गरज सरो, वैद्य मरो’… जिल्ह्यातील साडेपाचशे कोविड कंत्राटी कामगारांना घरचा रस्‍ता!; कर्मचाऱ्यांमध्ये संताप

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना संकटात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या 738 पैकी 550 कंत्राटी कामगारांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे कंत्राटी कामगारांत संताप व्यक्त होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. बुलडाणा स्त्री रुग्णालयातील शासकीय कोविड सेंटर वगळता जिल्ह्यातील अन्य 16 शासकीय कोविड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना संकटात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या 738 पैकी 550 कंत्राटी कामगारांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे कंत्राटी कामगारांत संताप व्यक्त होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

बुलडाणा स्त्री रुग्णालयातील शासकीय कोविड सेंटर वगळता जिल्ह्यातील अन्य 16 शासकीय कोविड हॉस्पिटलमधील सर्वच कामगारांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयातही केवळ 100 बेडसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वगळता इतरांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रारंभिक काळापासून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य विभागातील या कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी कामगारांनी केली आहे. यासाठी 19 जुलै रोजी जिल्ह्यातील कोविड कंत्राटी कामगारांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासकीय कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे या शासकीय कोविड सेंटरवरील वैद्यकीय अधिकारी, परीचारिका, कक्षसेवक, पॅरामेडिकल स्टाफ यांनाही सेवेतून कमी करण्यात आले आहे.

कोरोना संकटात आम्ही जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी होताच शासनाने कंत्राटी कामगारांना कार्यमुक्त केले.यामुळे या कोविड कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा व कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे.

– अमोल गवई, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कोविड कंत्रांटी आरोग्य कर्मचारी संघटना

शासनाची भूमिका गरज सरो नि वैद्य मरो अशी आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असताना शासनाने कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणे चुकीचे आहे. कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याऐवजी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण किंवा शहरी भागातील सामान्य रुग्णालय येथे शासकीय सेवेत समाविष्ट करावे.

– दीपाली लहाने, महिला जिल्हाध्यक्ष कोविड कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटना