गायकवाड-शिंदेंच्या वाकयुद्धात असभ्य भाषेचा प्रयोग; भाजप पदाधिकारी एसपींना भेटले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील वैरत्व सर्वश्रुत आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालामुळे दोघांत पुन्हा जुंपली. एकमेकांना प्रत्युत्तर देण्याच्या नादात असभ्य भाषेचा वापर झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप पदाधिकार्यांनी आज, 22 जानेवारीला पोलीस अधीक्षकांना भेटून केली. याबाबत आमदार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील वैरत्व सर्वश्रुत आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालामुळे दोघांत पुन्हा जुंपली. एकमेकांना प्रत्युत्तर देण्याच्या नादात असभ्य भाषेचा वापर झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी आज, 22 जानेवारीला पोलीस अधीक्षकांना भेटून केली. याबाबत आमदार गायकवाडांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वंचितकडून निवडणुकीत उतरलेल्या शिंदे यांना गायकवाड यांनी धोबीपछाड दिली. आधीच पक्षातून बाहेर पडल्याचे शल्य आणि त्यात पराभवाचे दुःख यामुळे शिंदेंचे राजकीय भवितव्य काय असेल, त्यांची रणनिती काय असेल यावर चर्चा घडत होती. अशावेळी शिवसेनेला पर्याय म्हणून शिंदे यांनी भाजपची वाट निवडली. भाजपची दारे येणार्‍या प्रत्येकासाठी खुली असल्याने त्यांनी शिंदेंना प्रवेश, पद आणि सोबतच प्रतिष्ठाही मिळवून दिली. पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्यत्व देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपने केला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या लोकप्रियतेला वेसन घालण्याचा प्रयत्नही या माध्यमातून घडेल असा होरा भाजपचा होता. पण तो नंतरच्या काळात फारसा यशस्वी झालेला नाही, हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचेच प्राबल्य दिसून आले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला आहे. त्या खालोखाल ग्रामपंचायती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीनंतर संजय गायकवाड यांनी 80 टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा दावा केला होता. तो खोडून काढत शिंदे यांनी शिवसेनेचा दावा म्हणजे फुसका बार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे संजय गायकवाड यांनी प्रतिटीका करत शिंदेंबद्दल असभ्य भाषा वापरल्याचा आरोप भाजप पदाधिकार्‍यांनी आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देत केला आहे आणि गायकवाडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. निवेदनावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम लाखोटिया, तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सिंधूताई खेडेकर, अ‍ॅड. मोहन पवार, सौ. सरला मंदार बाहेकर, गोविंदराव सराफ, सुभद्राताई इंगळे, उदय देशपांडे, अलकाताई पाठक, सौ. वर्षाताई पाथरकर, पुरुषोत्तम नारखेडे, अर्जुन दांडगे, संजय जुंबड, सुभाष कदम आदींच्या सह्या आहेत.
काय म्हणाले होते गायकवाड…
तो माजी आमदार गद्दार, खोटारडा असून, खोटे बोलूनच तीनदा आमदार झाला. ज्याने 15 वर्षांत सत्ता भोगली त्या xxx ला एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही.