गावगुंडांचा वीज कर्मचार्‍याच्या घरावर हल्ला; काठ्या, रॉडने बेदम मारहाण, रक्तबंबाळ केले, पत्नीलाही नाही सोडले!

जळगाव जामेाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध वीज जोडणीची व्हिडिओ शूटिंग वरिष्ठांना पाठविल्याने संतापलेल्या वीजचोरांनी कुटुंबासह महावितरणच्या कर्मचार्याला मारहाण केली. डोकेही फोडले. त्यांच्या सोबतच्या मतदनीसालाही मारहाण केली. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथे 12 जानेवारीला दुपारी घडली. या प्रकरणात जळगाव जामोद पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावगुंडांची दहशत या कुटुंबावर इतकी निर्माण …
 

जळगाव जामेाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध वीज जोडणीची व्हिडिओ शूटिंग वरिष्ठांना पाठविल्याने संतापलेल्या वीजचोरांनी कुटुंबासह महावितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण केली. डोकेही फोडले. त्यांच्या सोबतच्या मतदनीसालाही मारहाण केली. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथे 12 जानेवारीला दुपारी घडली. या प्रकरणात जळगाव जामोद पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावगुंडांची दहशत या कुटुंबावर इतकी निर्माण झाली की पोलिसांत तक्रार द्यायलाही त्यांची हिंमत होत नव्हती.
देविदास जनार्दन घनमोडे (35, रा. मानेगाव (वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण कंपनी) यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. मानेगाव येथील अवैध वीज कनेक्शनची पाहणी करण्यासाठी ते व त्यांचे मदतनीस निंबाजी प्रभाकर पैसोळे गेले होते. पाहणी करत असताना मानेगाव येथील विनोद समाधान इंदोरे, ज्ञानेश्‍वर रामकृष्ण बगेवार यांचे अवैध वीज कनेक्शन दिसून आले. त्याची शूटिंग काढून वरिष्ठांकडे घनमोडे यांनी पाठवली. त्याचवेळी तिथे अवैध विज कनेक्शन करणारे विनोद समाधान इंदौरे व त्याचे नातेवाईक प्रभाकर नागोजी मेहेंगे, मनोहर प्रभाकर मेहेंगे, सागर मनोहर मेहेंगे, वैभव मनोहर मेहेंगे, अरुण बाळू पाखरे गोळा झाले. त्यांनी व्हिडिओ शूटिंग तुझ्या साहेबाला का पाठविली, असे म्हणून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. घनमोडेंनी तिथून मदतनीसासह पळ काढत घरी आले. त्यांच्या पाठोपाठ विनोद इंदौरे हाही नातेवाकांना घेऊन आला. ते सर्व घरात घुसले. त्यांनी लाथा बुक्क्यांनी घनमोडे यांना मारहाण करून प्रभाकर मेहेंगे याने काठीने डोक्यात मारले. मनोहर मेहेंगे याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून डोके फोडले. अरुण पाखरे याने सुध्दा काठीने मारहाण केली. घनमोडे यांच्या पत्नी सौ. दीपाली व बहीण सौ. शुभांगी ढोले यांनी घनमोडे यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घनमोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद समाधान इंदौरे, प्रभाकर नागोजी मेहेंगे, मनोहर प्रभाकर मेहेंगे, सागर मनोहर मेहेंगे, वैभव मनोहर मेहेंगे, अरुण बाळु पाखरे (सर्व रा. मानेगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक सतिश आडे, पो.काँ. विकास गव्हाड हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करत आहेत.