गावाला जाताना घराची चाबी विश्वासाने दिली… त्यानेच केला विश्वासघात!; साडेचार लाखांची चोरी; नांदुरा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावाला जाताना घराची चाबी विश्वासाने ज्याच्याजवळ ठेवली त्यानेच घात करत साडेचार लाख रुपयांची घरफोडी केली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँक ऑफ इंडियाच्या नांदुरा शाखेत कृषी अधिकारी असलेले दीपक आसाराम सालवे (30, रा. शेगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. शिक्षक कॉलनी,नांदुरा) यांच्या वडिलांचे 16 मे रोजी निधन झाल्याने …
 
गावाला जाताना घराची चाबी विश्वासाने दिली… त्यानेच केला विश्वासघात!; साडेचार लाखांची चोरी; नांदुरा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गावाला जाताना घराची चाबी विश्वासाने ज्याच्याजवळ ठेवली त्यानेच घात करत साडेचार लाख रुपयांची घरफोडी केली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

बँक ऑफ इंडियाच्या नांदुरा शाखेत कृषी अधिकारी असलेले दीपक आसाराम सालवे (30, रा. शेगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. शिक्षक कॉलनी,नांदुरा) यांच्या वडिलांचे 16 मे रोजी निधन झाल्याने ते परिवारासह त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्यांनी त्यांच्या घराची चाबी विश्वासाने अतुल प्रल्हाद बोरसे यांच्याकडे दिली होती. अतुल हा सालवे नोकरी करत असलेल्या बँकेत चहा घेऊन येत होता. सालवे जेव्हा जेव्हा बाहेरगावी जायचे तेव्हा ते चाबी बोरसेकडे ठेवून जात होते. 30 मे रोजी सकाळी बोरसे याने सालवे यांना फोन करून सांगितले की घराचे समोरील लॉक तुटलेले आहे व घरात चोरी झाली आहे.

निरोप ऐकताच सालवे हे पत्‍नी व मुलासह तातडीने नांदुरा येथे पोहोचले. त्यांना बोरसे याने सांगितल्याप्रमाणे घराचे लॉक तुटलेले दिसले. घरात जाऊन बघितले असता देवघरातील व बेडरूममधील आलमारी उघडी होती. सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. आलमारीतील सोन्याचा नेकलेस, कानातील सोन्याचे झुमके, सोन्याची चैन, सोन्याची अंगठी असे सोन्याचे 4 लाख 51 हजार रुपयांचे दागिने लंपास झालेले दिसले. सालवे व त्यांच्या पत्‍नीला बोरसे याच्यावरच चोरीचा संशय असल्याने त्‍यांनी त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस तपास करत आहेत.