गाव देवपूर… वेळ आजची सकाळी साडेअकराची… घटना “आठवड्यातील सर्वांत हृदयस्पर्शी’; वाचून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयुष्यभर शेतात राबणारे बैल म्हणजे शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडाच. तहानभूक विसरून उन्हा तान्हात तो मालकाच्या भल्यासाठी राब राब राबतो. शेतकऱ्याच्या भावनाही त्याला लगेच कळतात, फक्त त्याला बोलता येत नाही असे म्हणतात. निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाला कधीतरी जीवनयात्रा संपवावीच लागते. त्याला प्राणीही अपवाद नाहीत. मात्र मनुष्य मेल्यानंतर ज्या उत्तरक्रिया होतात त्या मात्र प्राण्यांच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आयुष्यभर शेतात राबणारे बैल म्हणजे शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडाच. तहानभूक विसरून उन्हा तान्हात तो मालकाच्या भल्यासाठी राब राब राबतो. शेतकऱ्याच्या भावनाही त्याला लगेच कळतात, फक्त त्याला बोलता येत नाही असे म्‍हणतात. निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाला कधीतरी जीवनयात्रा संपवावीच लागते. त्याला प्राणीही अपवाद नाहीत. मात्र मनुष्य मेल्यानंतर ज्या उत्तरक्रिया होतात त्या मात्र प्राण्यांच्या नशिबात नसतात. मात्र देवपूर (ता. बुलडाणा) येथे बैलाच्या तेरवीचा कार्यक्रम करून शेतकऱ्याने कृतज्ञता जपली. आज, १० जुलैला देवपूरवासीय व नातेवाइकांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकरी बांधवांसह सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

देवपूर येथील माजी सरपंच संदीप विक्रम नरोटे (४५) यांच्या सुखऱ्या उर्फ चित्ता या बैलाचे २८ जूनला वयाच्या पंचविसाव्या वर्षी निधन झाले. विधिवत पूजा अर्चा करून त्याच्यावर अंत्यस्कार करण्यात आले. आज त्याच्या तेरवीचा कार्यक्रम झाला. सुखऱ्या अवघ्या दोन वर्षांचा असताना त्याला संदीप नरोटे यांचे वडील विक्रम नरोटे यांनी बाजारातून विकत आणले होते. तेव्हापासून घरच्यांना त्याचा लळा लागला. अतिशय बंड आणि उनाड स्वभावाचा असलेला सुखऱ्या शेतीकामात अतिशय चपळ होता. अनेकदा हातातून सुटला की बराच वेळ तो हाती लागत नसे. मात्र घरातील लहान मुले आणि महिला समोर येताच तो विनम्रपणे खाली मान करून उभा रहायचा, असे संदीप नरोटे यांनी सांगितले. एकदा संदीप नरोटे यांच्याकडून त्यांचा मुलगा सोहम चार वर्षांचा असताना धावत्या बैलगाडीतून खाली चाकाच्या आणि बैलांच्या पायाच्या मध्ये पडला. वेगात असलेल्या बैलगाडीचे चाक मुलगा सोहमच्या अंगावरून जाण्याची शक्यता होती.

मात्र बैलगाडीला जुपलेल्या सुखऱ्या ऊर्फ चित्याच्या लक्षात येताच त्याने लगेच स्वतःच्या वेगावर नियंत्रण मिळवले. त्याने पायही समोर टाकला नाही. त्यामुळे मोठ्या अपघातातून सोहमला सुखऱ्याने वाचवले हे सांगताना संदीप नरोटे यांना अश्रू अनावर झाले होते. सुखऱ्याच्या तरुणपणातील त्याच्या कार्यक्षमतेमुळे त्याला एक लाख रुपयात विकत मागण्यात आले होते. मात्र संदीप नरोटे यांनी विकले नाही. सुखऱ्याने पटाच्या शर्यतीतही अनेकदा बक्षिसे जिंकून दिली. गेल्या दोन वर्षांपासून सुखऱ्या म्हातारा झाला होता. त्याच्याकडून कामही होत नव्हते. अनेक कसायी येऊन म्हाताऱ्याला कशाला ठेवता म्हटले; पण तरीही नरोटे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सुखऱ्याचा सांभाळ केला. सुखऱ्यानेही मालकाची इमानइतबारे सेवा केली. बैलाचे सरासरी आयुष्यमान 20 वर्षांचे असताना सुख्यऱ्याने 23 वर्षे मेहनत केली आणि 28 जून रोजी वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.