गुड न्‍यूज : जिल्ह्यात 130 गावे आजपर्यंत कोरोनापासून कोसो दूर!; बॅड न्‍यूज ः म्युकरमायसिसचे जिल्ह्यात 27 रुग्ण!!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हावासियांसाठी दोन बातम्या आहेत. एक गुड न्यूज आहे तर दुसरी बॅड… गुड अशी की जिल्ह्यातील 130 गावांतील नागरिकांनी कोरोनाला अजूनही आपल्या गावाच्या आसपासही फटकू दिलेले नाही… तर बॅड न्यूज अशी की जिल्ह्यात म्युकरमायसिस या नव्या आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाला असून, सध्या 27 रुग्ण आढळले आहेत. …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हावासियांसाठी दोन बातम्‍या आहेत. एक गुड न्‍यूज आहे तर दुसरी बॅड… गुड अशी की जिल्ह्यातील 130 गावांतील नागरिकांनी कोरोनाला अजूनही आपल्या गावाच्‍या आसपासही फटकू दिलेले नाही… तर बॅड न्‍यूज अशी की जिल्ह्यात म्युकरमायसिस या नव्‍या आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाला असून, सध्या 27 रुग्ण आढळले आहेत.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, 21 मे रोजी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या कोविड आढावा बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी म्युकरमायसिसच्‍या रुग्‍णांची माहिती दिली. जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी जिल्ह्यातील एकूण गावांपैकी 640 गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळले असून, 130 गावांमध्ये आजपावेत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी उपस्थित होते.

नेमका काय आहे ‘म्युकरमायकोसीस’

म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशा वेळेस म्युकरमायकोसीसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसेसवर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दीर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार ( स्टिरोइड्सचा गरजेपेक्षा जास्त वापर) कर्करोग पीडित रुग्ण यांना ह्या आजाराची लागण होताना दिसून येते. डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्या मधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.

म्युकरमायकोसीसवर महात्मा फुले जनारोग्य अभियानातून उपचाराची सुविधा

म्युकर मायकोसीस या आजाराच्या उपचारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचारासाठी महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतगंर्त सर्जीकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रुपये एवढे विमा संरक्षण आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रुपये पर्यंत विमा संरक्षण आहे. त्यापुढे हमी तत्वावर 5 लक्ष रुपयांपर्यंत संरक्षण आहे. तसेच म्युकरमायकोसीस आजारावरील या आजारापूर्वी बाधित व्यक्तीवर अथवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीवर उपलब्ध विमा संरक्षणापैकी काही रक्कम खर्च झालेली असू शकते. म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराकरीता योजनेतील विविध पॅकेज एकत्रितरित्या व वारंवार पुनर्वापर करावा लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही आरोग्य योजनांमध्ये अनुज्ञेय विमा संरक्षणापेक्षा अधिक खर्च आल्यास अधिकचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर भागविण्यात येणार आहे. या आजारावरील उपचारामध्ये अँटी फंगल औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबंधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध असून महागडी आहेत. शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहीत कार्यपद्धती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रुग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावेत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्‍यामार्फत सनियंत्रण केले जाईल.  म्युकरमायकोसिस आजाराची तीव्रता जास्त प्रमाणात असून याकरिता बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासते. तसेच याकरिता येणारा खर्च ही जास्त आहे. यामुळे खासगी रुग्णालयातील उपचारावरील खर्चामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार योजनांच्या अंगीकृत रुग्णालयातून करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.