गोत्रा, ता. लोणार ः स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एससीसाठी सरपंचपद सुटले, पण….

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सरपंचपद अनुसूचित जातीसाठी सुटले. परंतु सदस्य निवडीवेळी वॉर्डात अनुसूचित जातीसाठी राखीव जागा न सुटल्याने अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडूनच आला नाही. त्यामुळे आता अनुसूचित जातीचा सरपंच करायचा कसा, असा पेच निर्माण झाला आहे तो लोणार तालुक्यातील गोत्रा या गावात. 7 सदस्य संख्या असलेल्या गोत्रा गावात ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सरपंचपद अनुसूचित जातीसाठी सुटले. परंतु सदस्य निवडीवेळी वॉर्डात अनुसूचित जातीसाठी राखीव जागा न सुटल्याने अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडूनच आला नाही. त्यामुळे आता अनुसूचित जातीचा सरपंच करायचा कसा, असा पेच निर्माण झाला आहे तो लोणार तालुक्यातील गोत्रा या गावात.


7 सदस्य संख्या असलेल्या गोत्रा गावात ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी एकही राखीव जागा मिळाली नाही. त्यामुळे या प्रवर्गाच्या उमेदवाराला सर्वसाधारण जागेवर उभे राहून निवडणूक लढवावी लागली. मात्र दुर्दैवाने या उमेदवाराचा पराभव झाला. निवडणुकीनंतर निघालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत गोत्रा गावाचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित निघाले. परंतु अनुसूचित जातीचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने आता सरपंच बनवायचे कुणाला, असा पेच निर्माण झाला आहे.
अनुसूचित जातीच्या परंतु सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावी लागणार्‍या सौ संगीता महिपत वाणी (रा. गोत्रा) यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात झालेली निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. सदस्य पदाची निवडणूक रद्द करून पुन्हा सदस्यासाठी आरक्षण काढावे आणि लगेच फेर निवडणूक घेऊन सरपंच पदाचा लाभ अनुसूचित जातीला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.