घाटावर गारपीट; पावसासह विजांचे थैमान; अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 18 फेब्रुवारी बेमोसमी पावसाने घाटावरच्या तालुक्यांत हजेरी लावली.बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार,सिंदखेडराजा या तालुक्यांत बहुतांश भागात दिवसभरापासून पावसाचे थैमान सुरू आहे. चिखली तालुक्यातील दिवठाणा, सोमठाणा, उत्रादा, सवणा, शिंदी हराळी परिसर तसेच अंचरवाडी, भरोसा या भागांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, कांदा या पिकांचे …
 

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 18 फेब्रुवारी बेमोसमी पावसाने घाटावरच्या तालुक्यांत हजेरी लावली.बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार,सिंदखेडराजा या तालुक्यांत बहुतांश भागात दिवसभरापासून पावसाचे थैमान सुरू आहे.

चिखली तालुक्यातील दिवठाणा, सोमठाणा, उत्रादा, सवणा, शिंदी हराळी परिसर तसेच अंचरवाडी, भरोसा या भागांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले. देऊळगाव राजा तालुक्यात देऊळगाव मही, धोत्रा नंदई परिसरातही गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मलकापूर पांग्रा परिसरातही संध्याकाळच्या सुमारास गारपीट आणि वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या तारा तुटल्याने मलकापूर पांग्रा येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील बिबी, मांडवा, चिखला, खंडाळा, महारचिकणासह परिसरात बहुतांश गावांत सायंकाळी सहाच्या सुमारास तुफान वारा व वादळी पावसासह गारपीट झाली. यात हरभरा, कांदा, गहू, ज्वारी, भाजीपालासह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाने आणि वाऱ्यामुळे विज तारा तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लोणार शहरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.