घोषणा शेतकऱ्यांसाठी, कर्जमाफी मात्र बुडव्‍या उद्योगपतींना ः नाना पटोलेंचे मोदींवर टिकास्‍त्र

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ येथे केली होती. मात्र प्रत्यक्षात कर्जबुडव्या उद्योगपतींचीच कर्जे माफ केली. यामुळे मोदी सरकारची शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवीच ठरली, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत काल, 9 जूनला केले. पटोले यांनी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 च्‍या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ येथे केली होती. मात्र प्रत्यक्षात कर्जबुडव्या उद्योगपतींचीच कर्जे माफ केली. यामुळे मोदी सरकारची शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवीच ठरली, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत काल, 9 जूनला केले.

पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्‍हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विदर्भ दौरा सुरू केला आहे. चिखली येथे कोरोना महामारीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्‍यांनी घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, आमदार कुणाल पाटील, आमदार वजहात मिर्झा, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, नाना गावंडे, बुलडाणाचे पक्ष निरीक्षक नाना देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोढे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री शेळके, लक्ष्मणराव घुमरे, मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नाना पटोले म्‍हणाले, की मोदी सरकारच्या कालावधीत पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मोदींचे भक्त म्हणतात राज्य सरकारने कर कमी करावा. इंधनाच्या करावरचा चार्ट सरकारकडून मागवला त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे, केंद्र सरकारचा कर किती ? राज्य सरकारचा कर किती… जरा तो चार्ट भक्तांना काँग्रेस पदधिकाऱ्यांनी वाचून दाखवावा. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या सार्वजनिक मालमत्ता विकण्याचा धडाका मोदी सरकारने लावला आहे. मोदी सरकारच्या या कृतीतून देश कंगाल करण्याचा आणि कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम होत आहे, असे पटोले म्‍हणाले.